पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा चित्रपट प्रदर्शित करु नका

नवी मुंबई : फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा ‘लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे मनसे सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या संदर्भात मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी परिवर्तन यात्रा दरम्यान सीवुडस्‌ मधील ग्रँड सेंट्रल मॉल येथील सिनेपोलिस सिनेमागृह प्रशासनाला निवेदन दिले. तसेच सिनेमा प्रदर्शित करु नका, अशी तंबी दिली.

हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणे, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करुन देणे असे प्रकार ‘मनसेे'ला मान्य नाही. महाराष्ट्र सोडाच; पण देशातील कुठल्याच राज्यात सदर सिनेमा तेथील सरकारांनी प्रदर्शित करण्यास परवानगी देऊ नये, असे राज ठाकरे यांनी जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की.

या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेव्हा देखील राज ठाकरे यांनी विरोध केल्यानंतर ‘मनसेे'ने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे आपण पाकिस्तानी सिनेमा सिनेपोलिस चित्रपटगृहात प्रदर्शित करु नये, अशी विनंती सिनेपोलिस सिनेमागृह व्यवस्थापनाला केल्याचे गजानन काळे यांनी सांगितले. तसेच सदर सिनेमा प्रदर्शित करायच्या भानगडीत सिनेपोलिस पडल्यास मनसे खळ्‌खट्याक पध्दतीने उत्तर देईल, असा इशारा देखीळ गजानन काळे यांनी दिला आहे.

‘मनसेे'च्या शिष्टमंडळात उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, महिला सेना शहर सचिव यशोदा खेडस्कर, विभाग अध्यक्ष अमोल आयवले, अक्षय भोसले, उमेश गायकवाड, गणेश भवर, विभाग सचिव आप्पासाहेब जाधव, उपविभाग अध्यक्ष संतोष टेकवडे, सुनिल शिंदे, राजेंद्र खाडे, शाखा अध्यक्ष संदीप कांबळे, अतिश पाटील, अखिल खरात, भरत माने, प्रणित डोंगरे, महेश सावंत, रामचंद्र कोकरे, अंकुश सानप, मंगेश काळेबाग, प्रद्युम्न हेगडे, शंकर घोंगडे-पाटील, मयांक घोरपडे, अमित टोंपे, किशोर ढवळे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आई गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रौत्सव जल्लोषात साजरा होणार...