‘परिवर्तन यात्रा' अंतर्गत ‘मनसे'ची एपीएमसी मार्केटला भेट
नवी मुंबई : ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या वतीने बेलापूर विधानसभा मतदारसंघात ‘परिवर्तन यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे. ‘परिवर्तन यात्रा'च्या दुसऱ्या दिवशी ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी तुर्भे येथील एपीएमसी मार्केट मधील शेतकरी, व्यापारी, मापाडी, माथाडी यांच्या भेटी घेवून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
‘परिवर्तन यात्रा'च्या दुसऱ्या दिवशी एपीएमसी दाणा मार्केट येथील शिवनेरी नगर पतपेढीला गजानन काळे यांनी भेट दिली. त्यानंतर भाजी मार्केट मधील जुना भाजीपाला व्यापारी महासंघ घाऊक, व्यापारी संघ तसेच इतर संघटना व्यापारी वर्ग आडतदार आणि मार्केट मधील माथाडी अशा विविध घटकातील मंडळींनी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये सर्वांनी आपल्या समस्या गजानन काळे यांच्या समोर मांडल्या. यादरम्यान व्यापारी बांधवांनी पावसाळ्यात गळती होऊन रोज शेतकरी आणि व्यापारी बांधवांच्या लाखों रुपयांच्या मालाचे नुकसान होत असल्याचे सांगितले. त्यावेळी गजानन काळे यांनी एपीएमसी प्रशासनातील अधिकाऱ्यांना तेथे बोलावून घडल्या प्रकाराचा जाब विचारला. येत्या २-३ दिवसात छप्पर दुरुस्ती करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.
दुसरीकडे फळ मार्केट आणि भाजी मार्केट मध्ये सगळीकडे अस्वच्छता असल्याने त्याचा त्रास तेथे येणाऱ्या सर्व घटकांना होत असूनही याबाबत एपीएमसी प्रशासन काहीच कार्यवाही करीत नसल्याने गजानन काळे यांनी संताप व्यक्त केला. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईतील तुर्भे येथील एपीएमसी मार्केटच्या झालेल्या दुरावस्थेला पूर्णपणे एपीएमसी प्रशासन जबाबदार असल्याचे गजानन काळे यांनी स्पष्टपणे नमूद केले. तसेच काही दिवसांपूर्वीच उघड झालेल्या शौचालय घोटाळ्यावर भाष्य करताना काळे यांनी एपीएमसी मार्केटमध्ये प्रशासनाकडून सुरू असलेल्या अनागोंदी भ्रष्टाचारावर बोट ठेवले.
दरम्यान, एपीएमसी मार्केट मधील सर्व घटकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर लवकरच ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सदर सर्व समस्या मांडून त्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन गजानन काळे यांनी संबंधितांना दिले. याप्रसंगी ‘मनसे'चे पदाधिकारी विलास घोणे, सचिन कदम, नितीन खानविलकर, अभिजीत देसाई, बाळासाहेब शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.