अन्यायकारक सिडको ट्रान्सफर चार्जेस रद्द करण्याची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबईत स्वतःचे घर घेणाऱ्या सर्वांनाच, सिडको ट्रान्सफर चार्जेसच्या रुपाने अन्यायकारक जीझिया कर लावल्या जातो. या कराविरुध्द सर्वपक्षीय मोहीम माजी उपमहापौर तथा ‘काँग्रेस'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल कौशिक, यांनी सुरु केलेली आहे. दरम्यान, सिडको ट्रान्सफर चार्जेसची समस्या सर्वच नवी मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिक आणि सर्वच राजकीय पक्षांचा ॲड. कौशिक यांच्या मोहिमेला पाठिंबा मिळत आहे.
नवी मुंबईतील ‘सिडको'चे हस्तांतरण शुल्क येथील रहिवाशांवर फार पूर्वीपासून अवाजवी भार आहे. १९९२ मध्ये नवी मुंबई महापालिकाची स्थापना होऊनही, ‘सिडको'ने मालमत्ता हस्तांतरणासाठी सिडको ट्रान्सफर चार्जेसच्या रुपाने भरमसाठ शुल्क आकारणे सुरुच ठेवले आहे. ज्यामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. ‘नमुंमपा'ची स्थापना होऊन एवढा काळ उलटून गेल्यामुळे, नवी मुंबईच्या प्रगतीमध्ये ‘सिडको'ची भूमिका आता नक्कीच मोठ्या प्रमाणात निरंक झालेली आहे. तसेच या निधीचा नवी मुंबईच्या प्रगतीसाठी होणाऱ्या वापराबाबत देखील पारदर्शकता नसल्याबद्दल चिंता व्यवत करण्यात येत आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्या दुहेरी करप्रणालीला सर्वच नवी मुंबईकर एकजूट होऊन विरोध करीत आहेत, असे ॲड. अनिल कौशिक यांनी सांगितले.
नवी मुंबईच्या विकासासाठी जबाबदार असलेल्या ‘सिडको'ने सुरुवातीला सवलतीच्या दराने लीजवर दिलेल्या जमिनीवर बांधलेल्या मालमत्तांवर हस्तांतरण शुल्क लागू केले. शहराच्या विकासासाठी निधी मिळण्यास मदत करण्यासाठी ते होते. पण, बाजारभावाने निविदांद्वारे लीजवर घेतलेल्या भूखंडांसाठी देखील शुल्क आकारणे नक्कीच न्याय नाही. बहुतांश विकासकामे पूर्ण करुनही ‘सिडको'ने बाजारभावाने खरेदी केलेल्या मालमत्तेवरही अन्यायकारकपणे सदर शुल्क आकारणे सुरुच ठेवले आहे. याचा कोणताही कायदेशीर आधार नसताना रहिवाशांवर बोजा पडत आहे. ऍड अनिल कौशिक
केवळ काही निवडक लोकांना लाभ देणारे, अन्यायकारक सिडको ट्रान्सफर चार्जेस पूर्णपणे रद्द करण्याची मागणी सिडको आणि महाराष्ट्र सरकार कडे एकमुखाने करण्याची वेळ आली आहे. त्याकरिता सर्व नवी मुबईकरांनी संघटीत होण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन ॲड. कौशिक यांनी नागरिकांना केले आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने सर्व नवी मुंबईकरांनी तसेच नवी मुंबईतील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आमच्या या मोहिमेमागे मजबुतपणे उभे राहावे, ही नम्र विनंती.
-ॲड. अनिल कौशिक, अध्यक्ष-नवी मुंबई जिल्हा काँग्रेस.
सिडको ट्रान्सफर चार्जेस विरोधातील मागणीसाठी प्रत्येक नवी मुंबईकराचे समर्थन मिळविण्यासाठी आमचे प्रतिनिधी याचिकेवर स्वाक्षरी घेण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यावर स्वाक्षरी करावी. तसेच आपण अत्यंत सोपा गुगल फॉर्म भरून सुध्दा आपण समर्थन द्यावे हि नम्र विनंती. अधिक माहितीसाठी [email protected] या ई-मेल वर संपर्क करावा. -श्यामभाऊ कदम, राज्य सहसचिव-आप, महाराष्ट्र.