बॉयलर इंडिया-2024 प्रदर्शनात बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर प्रणालीचे होणार लोकार्पण
नवी मुंबई : उद्योग आणि शासन या त्रिसूत्रीची सांगड घालून बाष्पके उद्योगाला चालना देण्यासोबतच बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करता येईल या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने दि. 25, 26 आणि 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये जागतिकस्तरावरील बॉयलर इंडिया 2024 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बॉयलर इंडिया 2024 या प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी 10.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय अधिकारी आणि उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनामध्ये बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर (बीएमएमएस) या प्रणालीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. बीएमएमएस प्रणालीमुळे बाष्पके उद्योगांमध्ये बाष्पक व त्याच्या सुटया भागाच्या निर्मितीची प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. बीएमएमएस सॉफ्टवेअरच्या मदतीने आता उत्पादनातील प्रत्येक टफ्फ्याचे संपूर्ण दस्तऐवजीकरण एका फ्लॅटफॉर्मवर सहजपणे करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पादक आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक चांगला होणार आहे.
बीएमएमएस सॉफ्टवेअरमुळे बॉयलर निर्मितीच्या प्रक्रियेत मोठया प्रमाणात सुधारणा होऊन संबंधित कागदपत्रांमध्ये सुलभता येण्यास मदत होणार आहे. हे सॉफ्टवेअर केवळ औद्योगिक कार्यक्षमता वाढवणार नाही, तर कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रदर्शनात बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रे, साहित्य मांडण्यात येणार आहेत. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, घडामोडी यांची माहिती व्हावी यासाठी तीन दिवस चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या क्षेत्रातील तज्ञ या परिसंवादात मार्गदर्शन करणार आहेत.
बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा, बाष्पक, हीट एक्सचेन्जर, प्रेशर व्हेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे, बाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदल, या क्षेत्रासंबंधीची माहिती प्रदर्शन, चर्चासत्र आणि कार्यशाळेच्या माध्यामांतून कौशल्य विकास व रोजगारांची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त उद्योजक आणि नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर यांनी केले आहे.