बनावट नोटा छापणारे बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता शाखेच्या पथकाने महापे येथील एका लॉजवर छापा मारुन बनावट नोटा छापणा-या बंटी बबलीला अटक केली आहे. विवेककुमार प्रेमबाबु पीपल (35) व अश्विनी विश्वनाथ सरोवदे (36) असे बंटी बबलीचे नाव असून हे दोघेही स्कॅनर प्रिंटरद्वारे बनावट नोटा तयार करुन त्या नोटा बाजारात आणत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. आर्थिक गुप्तवार्ता शाखेने त्यांच्याकडुन 500 आणि 100 रुपये दराच्या 81 हजार रुपये किमंतीच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जफ्त केले आहे.
महापे येथील कुणाल पॅलेस या लॉजमध्ये एक जोडपे मागील 5-6 महिन्यापासून संशयास्पदरित्या राहत असल्याचे तसेच ते मोठया प्रमाणात आर्थिक व्यवहार करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता शाखेला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी कुणाल पॅलेस लॉजवर छापा मारला. यावेळी विवेककुमार आणि अश्विनी राहत असलेल्या रुममध्ये पोलिसांना 13 मोबाईल फोन, स्कॅनर, प्रिंटर आणि लॅपटॉप आदी साहित्य आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी सर्व साहित्य जफ्त करुन विवेककुमार व अश्विनी या दोघांना ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या लॅपटॉपची तपासणी केली असता, त्यात 500 आणि 100 रुपये दराच्या नोटा स्कॅन केल्याचे आढळून आले. त्यानंतर आर्थिक गुप्तवार्ता विभागाच्या पथकाने या दोघांची चौकशी केल्यानंतर दोघेही स्कॅनर आणि प्रिंटरद्वारे बनावट नोटा तयार करुन त्या बनावट नोटा बाजारात आणत असल्याचे तपासात आढळुन आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या होंडासिटी कारची तपासणी केली असता, त्यात 81 हजार रुपये किंमतीच्या 500 व 100 रुपये दराच्या बनावट नोटा आढळुन आल्या. त्यानंतर या दोघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेले बंटी बबली विवेककुमार व अश्विनी हे दोघेही पनवेलमध्ये राहण्यास असून मागील चार पाच महिन्यांपासून ते महापे येथिल कुणाल पॅलेस लॉजमध्ये राहत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या दोघांनी मागील पाच सहा महिन्यांमध्ये मोठया प्रमाणात बनावट नोटा तयार करुन त्या बाजारात आणले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या दोघांनी अतापर्यंत किती बनावट नोटा बाजारात आणल्या याबाबत पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.