कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील निवडणूक कामांचा आढावा
कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या निर्देशानुसार १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मतदान जनजागृती, स्वीप-मतदान जनजागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपाययोजना, दुबार मतदार, मतदार यादीचे शुध्दीकरण-नमुना अर्ज ६, ७, ८, असुरक्षित मतदान केंद्रे, मतदान केंद्रांवरील सोयी-सुविधा, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याबाबत तसेच मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक यांच्या नेमणूका करणे, आदि विषयांबाबत चर्चा करण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांच्या सोयीसुविधांसाठी एका ठिकाणी सुमारे ७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे आणि तद्अनुषंगिक सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांच्या ठिकाणी रॅम्प आणि व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली. तसेच गुजर यांनी सदर प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे आणि प्रश्नांचे निरसन केले.
त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आपल्याकडूनही सहकार्य करावे, असे आवाहन विश्वास गुजर यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना केले.
सदर बैठकीप्रसंगी डोंबिवलीचे सहा.पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, ठाणे (झोपुप्रा) तहसिलदार श्रध्दा चव्हाण, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले, गट शिक्षणाधिकारी (पंचायत समिती) रुपाली खोमणे, नायब तहसिलदार सुरेश महाला तसेच ठाणे महापालिकेचे सहा.आयुक्त तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी अक्षय गुडधे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहा.आयुक्त तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी संजयकुमार कुमावत आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.