‘घोडबंदर रोड वाहतूक कोंडीमुक्त'साठी उपाययोजनांचा आढावा
ठाणे : गेल्या १५ दिवसात ‘घोडबंदर रोड'वरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. वाहतूक कोंडीपासून मुक्तीसाठी करीत असलेल्या या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्ते यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा उपाययोजना तसेच अडचणी याबाबत बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते.
सदर बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, उपायुक्त दिनेश तायडे आणि शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, ‘घोडबंदर रोड'चे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह ‘मेट्रो'चे अधिकारी उपस्थित होते.
‘घोडबंदर रोड'वरील वाहतूक कोंडीच्या समस्येची तड लावण्यासाठी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार विविध यंत्रणांनी एकमेकाशी समन्वय राखून उपाययोजना केल्याची आल्याची माहिती पोलीस उपायुवत पंकज शिरसाट यांनी बैठकीत दिली. तसेच सध्या असलेल्या अडचणी आणि त्यावरील संभाव्य तोडगे यांचे विवेचनही त्यांनी केले. त्याचबरोबर १२.५ टन क्षमतेच्या पुढील वाहने अवजड वाहने आहेत. त्यात सरसकट सर्व मालवाहू वाहने येत नाहीत. त्यामुळे तशी काही मालवाहू वाहने दिसली तर गैरसमज होतो, असेही उपायुवत शिरसाट यांनी स्पष्ट केले. गायमुख घाट, भाईंदर पाडा ते गायमुख या पट्ट्यामध्ये अजुनही वाहतुकीसंदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली.
१५० ते २०० टनाच्या गाड्या गायमुख घाटातून जातात. त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होतो. त्यामुळे येथे काँक्रिटीकरणाची आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे यांनी दिली. सदर मार्ग आता मीरा-भाईंदर महापालिकाकडे हस्तांतरीत करण्यात आला असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कापूरबावडी- माजीवडा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या यु टर्न ते विवियाना मॉल पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘मेट्रो'लगत सुरु असलेल्या २ उड्डाणपुलांच्या कामामुळे तेथील मार्गिका छोट्या झाल्या असल्याने सेवा रस्ते अधिक सक्षम करावे, अशी मागणी ‘मेट्रो'च्या अधिकाऱ्यांनी केली. त्यावर सेवा रस्त्यावरुन अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी व्यक्त केली. सदर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आधी सेवा रस्त्याचे सक्षमीकरण करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
सर्व रस्ते खड्डेमुक्त, समान पातळीचे असतील. त्यावर कुठेही उंचवटे तयार होणार नाहीत, याची खात्री सर्व यंत्रणांनी करावी. त्याचबरोबर सेवा रस्ते फेरीवाला मुक्त करणे, पार्किंग हटवणे आणि ओव्हरहेड वायरचा बंदोबस्त करणे अशी कामे महापालिका यंत्रणा तत्काळ करेल.
-सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका.
उलट्या दिशेची वाहतूक रोखण्यासाठी ‘टायर किलर'चा प्रयोग...
रस्त्यावर विरुध्द दिशेने वाहने चालवण्याच्या प्रकारांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘टायर किलर' बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत. त्यानंतर तेथे महापालिका तर्फे ‘टायर किलर' बसवण्यात येतील.
‘टायर किलर' बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या त्या भागात दिली जाईल. अशा प्रकारचे ‘टायर किलर' असल्याची माहिती देणारे बोर्ड १०० ते २०० मीटर आधीपासून लावण्यात येतील. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश असल्याची खात्री केली जाईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर मगच ‘टायर किलर' बसवले जातील. ‘टायर किलर'मुळे विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल, असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.