डोंबिवलीसाठी स्वतंत्र ५८५ कोटींची पाणी योजना

कल्याण :  शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करुन डोंबिवलीच्या पाण्यासाठी स्वतंत्र ५८५ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

बारवी पाणी पुरवठा योजना वरील वाढत्या मागणीमुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्राकरिता कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील आणि परिसरातील ग्राहकाच्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवली शहरातील काही भाग, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र आणि आसपासच्या भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात येत असून यासाठी ‘एमआयडीसी'च्या माध्यमातून ५८५ कोटी रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत जलवाहिनी टाकण्याबरोबरच विविध कामे केली जाणार आहेत. या योजनेच्या पुनर्जीवनासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या विभागातील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे.

‘कल्याण'चे खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील शहरांना मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ मधील ग्रामीण भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. याच पध्दतीने कल्याण, डोंबिवली, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी राज्याचा पाणी पुरवठा विभाग, एमआयडीसी यांच्या समवेत सातत्याने बैठका घेऊन वाढीव पाणी पुरवठ्याची मागणी केली होती.

या मागणीनुसार कल्याण-डोंबिवली शहराला वाढीव पाणी पुरवठा देखील मिळाला आहे. मात्र, यापुढेही जाऊन नागरिकांना अधिक दाबाने मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेले काही वर्ष बंद असलेली शहाड पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शहाड येथे १८० द.ल.लि. प्रति दिन क्षमतेची शहाड पाणी पुरवठा योजना सन-१९६६ पासून ३ टप्यात बांधण्यात आली होती. या योजनेतून उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली तसेच डोंबिवली औधोगिक क्षेत्रसाठी पाणी पुरवठा करण्यात येत होता. बारवी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यावर कालांतराने शहाड पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा फक्त उल्हासनगर शहरासाठी सीमित करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर ५८५ कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून जलशुध्दीकरण केंद्रात २५०० घ.मी. क्षमतेची शुध्द पाण्याची नवीन साठवण टाकी वरील उदंचन केंद्र तेथून ५० द.ल.लि. प्रतिदिन पाणी पुरवठा करण्याकरिता नवीन पंपींग मशीन बसविण्यात येणार आहे. जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर हाऊस आणि पंप हाऊसचे दुरुस्तीकरण-मजबुतीकरण करणे, फिल्टर मधील बॅकवॉशचे अशुध्द पाणी शुध्द करण्याकरिता नवीन केंद्र बसविणे, जॅकवेल आणि उदंचन केंद्र, जलशुध्दीकरण केंद्र परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करुन डांबरीकरण करणे आणि यासाठी विविध ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.

शहाड पाणी पुरवठा योजनेतून सध्या १२० द.ल.लि. प्रतिदिन पाणी पुरवठा केला जातो. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील आणि आजुबाजुच्या रहिवासी वसाहतीमधील पाण्याची कमतरता पाहता शहाड पाणी पुरवठा योजनातील १८० द.ल.लि. प्रतिदिनची पूर्ण क्षमता वापरुन ५० द.ल.लि. प्रतिदिन डोंबिवली औद्यागिक क्षेत्राकरिता पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित होते. त्याप्रमाणे शहाड पाणी पुरवठा योजनाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यानुसार शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात येत असून यासाठी ‘एमआयडीसी'च्या माध्यमातून ५८५ कोटी रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची मुबलक पाण्याची तहान मिटणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डोंबिवली मधील लाखो नागरिकांना दिलासा मिळणाार आहे. तर सदर निर्णय घेतल्याबद्दल ना. उदय सामंत यांचे आभार मानतो.
-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सिडको ट्रान्स्फर चार्जेस रद्द करावे