नवी मुंबई महापालिका मध्ये अभियंता दिन साजरा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अभियांत्रिकी विभागाच्या वतीने नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित ‘अभियंता दिन' साजरा करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, अभियंते तथा उद्योजक-लेखक-व्याख्याते प्रफुल्ल वानखेडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी आणि अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे आणि त्याचा आपल्या कामात वापर केला पाहिजे. याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे असे सांगत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करुन शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणाचे भान राखून काम केले पाहिजे, असे या अभियंता दिन  कार्यक्रमात सांगितले.

देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान अभियांत्रिकी शाखेचे असून नवी मुंबईच्या आजवरच्या प्रगतीतही अभियंत्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. यापुढील काळात तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेत प्रत्येकाने स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल या गोष्टींकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज विषद केली. ‘नमुंमपा'चे अभियंते म्हणून लोकसेवेची एक चांगली संधी उपलब्ध झाली असून तिचा पूर्ण क्षमतेने वापर करायला हवा, असे ते म्हणाले.

तसेच यापुढील वर्षापासून अभियंता दिनी वर्षभरात चांगली कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा सन्मान केला जावा. त्यासाठी निकष तयार करुन त्यानुसार निवड करावी, अशी सूचना आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी केली.

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी १५ सप्टेंबर रोजीच्या अभियंता दिनी गणेश विसर्जनाचे काम असल्याने ड्युटी फर्स्ट म्हणत आज साजरा केला जात असल्याबद्दल अभियंत्यांच्या कृतीशीलतेचे कौतुक केले. अभियंत्यांमुळे मानवी जीवन सुखी झाले असल्याचे सांगत त्यांनी निवासयोग्य नवी मुंबई शहराच्या उभारणीत आपल्या अभियंत्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.

अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी १९२ पासून ‘नमुंमपा'ने केलेल्या विकास कामांचा आढावा घ्ोताना यापुढील काळात आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अधिक उत्तम सेवा-सुविधा पुरविण्यासाठी अभियांत्रिकी विभाग कटीबध्द असल्याचे सांगितले. सध्या सुरु असलेले सायन्स पार्क, सेंट्रल लायब्ररी, ऐरोली नाट्यगृह असे प्रकल्प दर्जेदार होण्यासाठी कृतीशीलपणे काम सुुरु असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक वॉर्डात स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स उभारुन शहराच्या क्रीडा विकासासाठी भरीव काम केले जात असल्याची माहिती दिली.

जो सर्जनशील, तोच अभियंता -प्रफुल्ल वानखेडे
यावेळी सुप्रसिध्द लेखक तथा ऊर्जा क्षेत्रातील नामांकित उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी ‘शहर विकासातील अभियंत्यांचे योगदान' या विषयावर अभ्यासपूर्ण आणि विनोदी शैलीत दिलखुलास संवाद साधला. स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनिअर असल्याने आपल्या शैक्षणिक जीवनातील अनुभव खुसखुशीतपणे सांगत ‘जो सर्जनशील असतो तोच अभियंता असतो' असे विविध उदाहरणे देत सांगून त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.

जेव्हा नाविन्यपूर्णता अंगिकारण्याची आणि वापरण्याची सुरुवात होते तिथूनच इंजिनिअर म्हणून खरा प्रवास सुरु होतो. माणसांसारखे शहरांचेही स्वभाव असतात असे सांगत वानखेडे यांनी अस्सल नवी मुंबईकर असल्याचा अभिमान यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमात अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे यांनी भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या चरित्राचे वाचन केले. कार्यकारी अभियंता वसंत पडघन यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करुन दिला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वीज कंपन्यातील १ लाख कर्मचारी-अभियंते यांचा संपाचा इशारा