निर्विघ्नं विसर्जन सोहळा संपन्न
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने सर्व विसर्जनस्थळी केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नंपणे पार पडला. २२ नैसर्गिक आणि १३७ कृत्रिम विसर्जनस्थळी उत्सवाच्या दहाव्या दिवशी ७८४६ घरगुती आणि ५८९ सार्वजनिक अशाप्रकारे एकूण ८४३५ श्रीगणेशमुर्तींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ८९६ शाडुच्या श्रीमुर्तींचा समावेश होता.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बनविण्यात आलेल्या मोठ्या व्यासपीठावरुन विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणाऱ्या श्रीगणेशमुर्तींवर पुष्पवृष्टी करीत श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप देत श्रीगणेशभक्तांचे स्वागत केले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच अति.आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार संजीव नाईक आणि इतर माजी नगरसेवक यांनी व्यासपीठास भेट दिली.
महापालिकेच्या वतीने सर्वच विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दुपारपासूनच मोठ्या संख्येने मूर्ती विसर्जन होते, अशा कोपरखैरणे धारण तलावावरील नवीन यांत्रिकी तराफा तसेच क्रेन सुविधेची पाहणी केली. तसेच इतर विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळांनाही भेटी देत व्यवस्थेची पाहणी केली होती.
अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशाच्या आकाराने मोठ्या मुर्तींचे विसर्जन होणार असल्याने सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सक्षम व्यवस्था ठेवण्यात आली होती. यामध्ये २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक आणि लाईफगार्डस् तसेच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत होते. पोलीस यंत्रणा सर्व विसर्जन स्थळे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज होती. सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ‘नमुंमपा'च्या वतीने सीसीटिव्ही लावण्यात आले होते. श्रीमूर्ती विसर्जनाकरिता विसर्जनस्थळी मध्यम आणि मोठ्या तरापयांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात, अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिपट, क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.
नमुंमपा क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ६३८१ घरगुती तसेच ५७८ सार्वजनिक मंडळांच्या ६९५९ श्रीमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १३७ कृत्रिम विसर्जन स्थळांवर १४६५ घरगुती तसेच ११ सार्वजनिक मंडळांच्या १४७६ श्रीमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.अशाप्रकारे ७८४६ घरगुती आणि ५८९ सार्वजनिक मंडळांच्या एकूण ८४३५ श्रीगणेशमुर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या ८९६ श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे यादृष्टीने ‘नमुंमपा'च्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात १३७ इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनास मोठया प्रमाणावर पसंती दर्शविली. तर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महिनाभरापूर्वींच गणेशोत्सवासंबधी आढावा बैठकीप्रसंगी ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव' साजरा करण्याबाबत नागरिकांना केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद लाभलेला दिसून आला.
अनेक नागरिकांनी पीओपी ऐवजी शाडुच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास पसंती दर्शविली. शाडुच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करणाऱ्या गणेशभक्तांना स्वच्छता-पर्यावरणमित्र म्हणून महापालिका मार्फत प्रशस्तीपत्र देऊन सर्व विसर्जनस्थळी सन्मानित करण्यात आले. एकंदरीतच नागरिकांकडून मिळालेल्या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवातील श्रीमूर्ती विसर्जन उत्तम रितीने निर्विघ्नंपणे पार पडले असून अनेक नागरिकांनी ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव' साजरा करण्यास पसंती दर्शाविली.