स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा शिल्प स्मारकांची पडझड
उरण : देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या पुतळ्याची (शिल्प स्मारकांची) तसेच हुतात्मा स्मारकाची सध्या पडझड सुरु झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले, त्यासारखी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या शिल्प स्मारकांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी चिरनेर गावाला भेट देणारे पर्यटक नागरिक व्यक्त करीत आहेत.
ब्रिटीश राजवटी विरोधात उरण, पनवेल तालुक्यातील जनतेने ‘चिरनेर'च्या भूमीत २५ सप्टेंबर १९३० साली शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारले. यावेळी ब्रिटीश सरकारच्या जुलमी पोलीस यंत्रणेने आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नांग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसुराम बुधाजी घरत (खोपटा), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या ८ आंदोलनकर्त्यांना वीरमरण प्राप्त झाले. तसेच ३८ आंदोलनकर्ते जखमी झाले होते.
स्वातंत्र्य संग्रामातील या गौरव आणि तेजस्वी लढ्याचे स्मरण युवा पिढीला व्हावे यासाठी चिरनेर गावातील स्मृती स्तंभासमोर हुतात्मा स्मारकांची आणि हुतात्म्यांच्या पुतळ्याची (शिल्प स्मारकांची) उभारणी करण्यात आली. परंतु, प्रशासनाला चिरनेर, दिघोडे, धाकटी जुई, मोठी जुई, कोप्रोली, पाणदिवे, खोपटा या ७ स्मारकांकडे आणि हुतात्म्यांच्या पुतळ्यांकडे लक्ष केंद्रित करण्यास वेळच मिळत नाही. त्यामुळे हुतात्मा स्मारकांची दुरावस्था झाली आहे. परशुराम रामा पाटील या हुतात्म्याच्या हातातील साहित्य (कोयता) निखळून पडला आहे. तसेच इतर हुतात्म्यांच्या हातातील ध्वजाची, अंगावरील कपड्यांची पडझड सुरु झाली आहे. त्यामुळे हुतात्म्यांच्या स्मारकांना, हुतात्म्यांच्या पुतळ्यांना नवा लुक प्राप्त करुन देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी चिरनेर गावात ये-जा करणारे पर्यटक नागरिक करीत आहेत.
२५ सप्टेंबर २०२४ रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४ वा हुतात्मा स्मृतीदिन कार्यक्रम यावर्षी शासकीय मानवंदना देऊन रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती उरण, चिरनेर ग्रामपंचायत आणि नवी मुंबई पोलीस यंत्रणा साजरा करणार आहेत. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या शिल्प-स्मारक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन चिरनेर गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पुढाकार द्यावा.
-सौ. सविता सुभाष ठाकूर, स्वातंत्र्य सैनिक वारस तथा माजी ग्रामपंचायत सदस्या.