नवी मुंबई विमानतळ कंपनीचे इमारतीच्या उंचीच्या निर्बंधाबाबत पत्र
नवी मुंबई : नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. (एनएमआयएएल) कंपनीने इमारतींच्या उंचीचा तपशील मागवलेल्या पत्रामुळे नेरुळ, सीबीडी परिसरातील रहिवासी आणि कार्यकर्त्यांनी गदारोळ केला आहे.
‘एनएमआयएएल'ने एरोड्रोमच्या २० कि.मी.च्या परिघात उंचीच्या निर्बंधांबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिसुचनेचा हवाला देऊन तपशील मागवला आहे. ‘एनएमआयएएल'ने गेल्या वर्षी वैमानिक सर्वेक्षण करुन त्यात काही इमारती उंचीच्या निर्बंधांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. यामध्ये न्यु सीवुडस्, नेरुळ येथील निवान ग्रांडेच्या प्रकरणात, पत्राने बांधकाम केलेल्या इमारतीची सर्वात वरची उंची, सुरु होण्याच्या आणि पूर्ण होण्याच्या तारखा, मंजूर इमारतीचा आराखडा, भोगवटा प्रमाणपत्राची प्रत, वर्ल्ड जिओडेटिक सिस्टम १९८४ समन्वय (अक्षांश, रेखांश आणि लंबवर्तुळाकार उंची वापरुन पृथ्वीवरील स्थिती दर्शवितात), भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची प्रत आणि इतर कोणतीही संबंधित माहिती याचा समावेश आहे.
संबंधित ठिकाणच्या रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या असतानाच, ‘एनएमआयएएल'ने अशा पत्रांमुळे लोकांमध्ये तणाव का निर्माण केला आहे? असा प्रश्न ‘अलर्ट सिटीझन्स'चे निमंत्रक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केला. त्यांनी सदर पत्राबाबत भोगवटा प्रमाणपत्र देणाऱ्या नवी मुंबई महापालिका आणि ‘सिडको'चे लक्ष वेधले असून, एनएमआयएएल थेट रहिवाशांशी संपर्क का करत आहे? असा सवलाही कुमार यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे विमानतळ प्रकल्पाचे प्रभारी असलेल्या ‘सिडको'ने नेरुळ मधील डीपीएस शाळेजवळून विमानतळ सर्वेक्षण रडार (एएसआर) बेलापूरच्या ढाकले बेटावर हलवण्यात आले होते. या हालचालीमुळे ५५ मीटर उंचीचे सर्व निर्बंध शिथील झाले असावेत. त्यामुळे १६ मजल्यांच्या पलीकडे बांधकाम सुलभ होईल, असे बी. एन. कुमार यांनी सांगितले.
किंबहुना ‘सिडको'चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी एएआयच्या एएसआरला स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाचे वर्णन नागरिकांसाठी अनुकूल असे केले होते. ज्यामुळे विमानतळाचे काम सुरळीत पूर्ण होण्याचा आणि केवळ नवी मुंबईच्याच नव्हे तर संपूर्ण एमएमआरच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे कुमार म्हणाले.
दरम्यान, ‘नमुंमपा'च्या माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांनी सदरचा मुद्दा आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून महापालिकेकडे उचलून धरला आहे. रहिवाशांना त्रास देण्याऐवजी ‘एनएमआयएएल' नवी मुंबई महापालिका कडे इमारतीचे रेकॉर्ड तपासू शकले असते. विमानतळ प्रकल्पाची कल्पना येण्यापूर्वीच या इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ‘एनएमआयएएल'शी चर्चा करु, असे आश्वासन नाईक यांनी दिल्याचे नेत्रा शिर्के यांनी सांगितले.