पाचव्या दिवशीही 7940 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन निर्विघ्नपणे संपन्न
शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा ‘पर्यावरणमित्र’ प्रशस्तिपत्राने सन्मान
नवी मुंबई : ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्याच्या नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आवाहनास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला असून शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेशभक्तांना स्वच्छता व पर्यावरणमित्र प्रशस्तिपत्र देऊन सर्वच विसर्जनस्थळी सन्मानित करण्यात आले. पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपणाऱ्या नागरिकांना प्रशस्तिपत्राव्दारे प्रोत्साहित करणाऱ्या महानगरपालिकेच्या या अभिनव संकल्पनेचे भाविकांकडून मोठया प्रमाणात स्वागत करण्यात आले. याव्दारे सर्वच नागरिकांमध्ये पर्यावरण जपणूकीचा संदेश प्रसारित होईल अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
5 व्या दिवशीच्या गणेशमूर्ती विसर्जन प्रसंगी महापालिकेने 22 नैसर्गिक आणि 137 कृत्रिम अशा एकूण 159 विसर्जन स्थळांवर केलेल्या चोख व्यवस्थेत 7940 गणेशमूर्तींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. महानगरपालिकेच्या व्यवस्थेची घरगुती व सार्वजनिक मंडळे यांच्यासोबत आलेल्या भाविक भक्तांनी प्रशंसा केली.
नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 5902 घरगुती तसेच 113 सार्वजनिक मंडळांच्या 6015 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 137 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1914 घरगुती तसेच 11 सार्वजनिक मंडळांच्या 1925 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 7816 घरगुती व 124 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 7940 श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 1185 मूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
शाडूच्या 1185 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करुन इको फ्रेंडली दृष्टीकोन जपणाऱ्या नागरिकांचा सन्मान....
यावर्षीचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांनी महिनाभरापूर्वीच गणेशोत्सवपूर्व नियोजन बैठकीप्रसंगी केले होते. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे निदर्शनास आले. अशा भाविकांना स्वच्छता व पर्यावरणमित्र प्रशस्तिपत्र देऊन प्रोत्साहित करण्याचा अभिनव उपक्रम सर्वच विसर्जन स्थळांवर राबविण्यात आला. पाचव्या दिवशीच्या विसर्जनप्रसंगी 1185 शाडूच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1925 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जित करुन नागरिकांनी जपला पर्यावरणशील दृष्टीकोन...
दीड दिवसाच्या विसर्जन सोहळयाप्रमाणेच 5 दिवसांच्या विसर्जन प्रसंगीही नागरिकांनी मोठया प्रमाणात कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करुन नैसर्गिक जलस्त्रोतांची होणारी हानी रोखण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात निर्माण केलेल्या 137 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1925 श्रीगणेशमूर्तींचे नागरिकांनी भाविकतेने विसर्जन केले. कृत्रिम विसर्जन तलावात श्रीमूर्ती विसर्जन करून पर्यावरण संरक्षणाचे आनंद मिळण्यासोबतच हे कृत्रिम तलाव घरापासून जवळच असल्याने व याठिकाणी त्या मानाने गर्दी कमी असल्याने बाप्पाला शांततेत निरोप देता येतो अशाही समाधानी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त् करण्यात आल्या.
सर्व 159 विसर्जन स्थळी नमुंमपाची यंत्रणा सज्ज...
नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती आणि नागरिकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा व व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. मुख्य विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आलेली असून विभाग कार्यालयांच्या वतीने विसर्जनस्थळी पुरेशा संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्ड्स व्यवस्था सज्ज आहे. नमुंमप अग्निशमन दलाचे जवान दक्षतेने कार्यरत कार्यरत आहेत.
निर्माल्याचे पावित्र्य राखून संकलन व वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत...
नमुंमपा क्षेत्रातील सर्व विसर्जन स्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले असून संकलित निर्माल्य स्वतंत्र वाहनांव्दारे प्रकल्प स्थळी नेण्यात येत आहे. त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची विल्हेवाट लावण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. या स्वच्छता विषयक बाबींकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे आणि डॉ.संतोष वारुळे यांचे बारकाईने लक्ष असणार आहे. स्वच्छता कार्याला वेग दिला.
दरम्यान, दीड दिवसाप्रमाणेच 5 दिवसांच्या कालावधीतील श्रीगणेशमूर्ती विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. सातव्या व अनंत चतुर्दशी दिनी संपन्न होणारा विसर्जन सोहळाही सुव्यस्थिपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे आणि आपल्या घराजवळच्या कृत्रिम विसर्जन तलावात श्रीगणेशमूर्ती विसर्जित करुन पर्यावरणशील दृष्टीकोन कृतीतून दाखवावा, असे आवाहनही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.