यशस्वी निवेदनाचे पाठ्यपुस्तक बोलता बोलता -प्रा. प्रवीण दवणे

ठाणे : प्रसिध्द निवेदक तथा नवी मुंबई महापालिका मुख्य जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे लिखित ‘बोलता बोलता' पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिध्द साहित्यिक, कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांच्या शुभहस्ते ठाणे येथे मोजक्या साहित्य रसिकांसह अतिशय आत्मिय वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी सौ. प्रज्ञा दवणे, लेखक-निवेदक महेंद्र कोंडे, ‘व्यास क्रिएशन्स'चे संचालक निलेश गायकवाड, ‘व्यास पब्लिकेशन हाऊस'च्या प्रकाशिका वैशाली गायकवाड, साहित्यिक विनोद पितळे, निवेदिका वेदश्री दवणे उपस्थित होते.

निवेदन, सूत्रसंचालन क्षेत्रातील वैविध्य टिपणारे महेंद्र काेंडे यांचे ‘बोलता बोलता' पुस्तक जणू ‘यशस्वी निवेदनाचे पाठ्यपुस्तक' असून पुस्तक वाचून, अभ्यासून आणखी ८-१० वर्षांनी चांगल्या निवेदकांची फळी महाराष्ट्रात निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको, अशा शब्दात  प्रा. प्रवीण दवणे यांनी या पुस्तकाचे महत्व सांगत शुभेच्छा दिल्या.

वाद्यवृंदांचे बैठकी निवेदन, उभ्याने निवेदन, विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, आकाशवाणी, दूरदर्शन, एफएम वाहिन्या, ऑनलाईन कार्यक्रम यांचे निवेदन अशा नानाविध क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या या पुस्तकामधील सगळी प्रकरणे ओघवत्या निवेदनासारखी असून केवळ निवेदन, सूत्रसंचालनच नाही; तर व्यासपीठावर कोणत्याही प्रकारची शब्द मुशाफिरी करु इच्छिणाऱ्यांसाठी सदर पुस्तक अत्यंत उपयोगी असल्याचे प्रवीण दवणे म्हणाले. बोलू इच्छिणाऱ्या प्रत्येकापर्यंत त्यातही विद्यार्थ्यांप्रमाणेच विशेषत्वाने सर्व शिक्षक, प्राध्यापकांपर्यंत अत्यंत उपयुक्त पुस्तक पोहोचले पाहिजे, असे प्रा. दवणे यांनी सांगितले.

विविध ठिकाणच्या कार्यक्रमांतील सूत्रसंचालकांच्या अनेक गमतीजमतीही त्यांनी सांगितल्या. सूत्रसंचालक वक्त्यांना ‘भाषण आवरते घ्या' म्हणून चि्ी्या देतात. मात्र, काही सूत्रसंचालक इतके बोलतात की त्यांना चि्ीी कोण देणार? असा प्रश्न पडतो. ‘बोलता बोलता' पुस्तक म्हणजे निवेदक, सूत्रसंचालकांना दिलेली चि्ीी आहे, अशी मिश्किल टिप्पणीही प्रवीण दवणे यांनी केली.

पं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते आण अनेक नामांकित गायकांच्या कार्यक्रमांचे निवेदन केले असल्याने या लेखनाशी माझे सूर त्वरेने जुळले असे सांगत प्रवीण दवणे यांनी त्या निवेदनाच्या काळातील आठवणींचा खजिना खुला केला. गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी ठमला केवळ गोड आवाजाचा निवेदक नको तर मजकुराचा निवेदक पाहिजे असे म्हणत प्रवीण दवणे यांनीच त्यांची मुलाखत घ्यावी असा धरलेला आग्रह सांगताना उत्स्फुर्तता असा निवेदकाचा सर्वात मोठा गुण असून त्यासाठी निवेदक पाठांतऱ्यापेक्षा सर्जनशील हवा असे मत मांडले.

तर ज्ञानसाधना महाविद्यालयात प्रवीण दवणे सर वर्गात बोलू लागले की, प्राणांचे कान करुन ऐकण्याच्या संस्कारातूनच सूत्रसंचालन, निवेदनाची बीजे खोलवर रुजली असावीत असे सांगत निवेदक-लेखक महेंद्र कोंडे यांनी प्रवीण दवणसरांचे अभ्यासपूर्ण प्रस्तावनारुपी शब्दाशीर्वाद या पुस्तकाला लाभणे, भाग्ययोग असल्याचे म्हटले. वर्तमानपत्रातील सदरात पहिला लेख छापून आला त्याच दिवशी याचे आपण पुस्तक करुया असा शब्द खरा करणारे बालमित्र, ‘व्यास क्रिएशन्स'चे निलेश गायकवाड आणि त्यांच्या पत्नी वैशाली गायकवाड यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

याप्रसंगी निलेश गायकवाड, वैशाली गायकवाड व विनोद पितळे यांनी शब्द शुभेच्छा दिल्या. निवेदिका वेदश्री दवणे यांनी या कौटुंबिक स्वरुपातील पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे ओघवते सूत्रसंचालन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विसर्नजनाच्या दिवशी कोपरखैरणे परिसरात वाहतुकीत बदल