अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा खड्ड्यावर!
कल्याण : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असून कल्याणमध्ये मात्र खड्ड्यांमधून बाप्पाचे आगमन झाल्याचे दिसून आले. कल्याण पश्चिम मधील गौरी पाडा रस्त्यावरील खड्डयात गणरायाचे आगमन झाले. अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा खड्ड्यावर अशा घोषणा देत ‘मनसे'ने खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन केले.
‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली गणपतीची वेशभूषा करुन मनसैनिक या आंदोलनात सहभागी झाला तर इतर पदाधिकारी कार्यकर्ते हातात टाळ घेऊन गणपतीच्या घोषणा देत मिलिंद नगर ते गौरी पाडा तलाव अशी मिरवणूक काढली. तसेच खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसी प्रशासनाला सुबुध्दी येऊ दे, अशाप्रकारचे गाऱ्हाणे देखील घातले.
गौरी पाडा तलाव येथे हजारो गणपतींचे विसर्जन केले जाते. रोज हजारो नागरिक याठिकाणी ये-जा करत असतात. त्यामुळे नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाने खड्डे न बुजविल्याने सदर आंदोलन केल्याचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी सांगितले. या आंदोलनात माजी नगरसेविका लक्ष्मी बोरकर, रोहन आक्केवार, कपिल पवार, गणेश लांडगे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.