शिवछाया मित्र मंडळाचा शिवराज्याभिषेकाचा देखावा पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच गर्दी

नवी मुंबई : तुर्भे नवी मुंबई येथील शिवछाया मित्र मंडळ या वर्षी ५४वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असून भव्य व आकर्षक "शिवराज्याभिषेक" हे या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरले असून हा देखावा पाहण्यासाठी व नवी मुंबईच्या राज्याच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसा पासूनच भाविकांची प्रचंड गर्दी लोटली आहे. सभामंडपात सुमारे ८० फुट लांब, ४० फूट रुंद व २५ फूट उंच अशा आकाराचा शिवराज्याभिषेकाचा देखावा असून यात श्री गणेशाची दहा फूट उंचीची मूर्ती विराजमान होणार आहे. शिवराज्याभिषेकाचा हा भव्य देखावा चेंबूर येथील अमोल पाष्टे यांनी साकारला असून नवी मुंबईच्या राजाची मूर्ती मूर्तिकार कुणाल डिंगणकर यांनी घडवली आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही भजन, हरिपाठ, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार, अन्नदान, अथर्वशीर्ष वाचन, सत्यनारायण महापूजा तसेच नवी मुंबईतील कलावंतांचा यथोचित सन्मान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोस्टरच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या "निश्चय केला, नंबर पहिला" या नवी मुंबई महानगर पालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांची माहितीही या माध्यमातून नवी मुंबईकरांना दिली जाणार आहे. याच बरोबर या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचाही जागर केला जाणार आहे. यास्तव १ लाख भाविकांना कापडी पिशव्यांचेही वाटप केले जाणार आहे. 

शिवछाया मित्र मंडळ आयोजित नवी मुंबईच्या राजाची नवसाला पावणारा राजा म्हणून सर्वत्र ख्याती असून नवी मुंबईच्या या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पेण, पनवेल, अलिबाग परिसरातील  ८ ते १० लाख भाविक येत असतात. या वर्षीही हा उत्साह कायम राहणार असल्याचे उपक्रमाविषयी माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अंकुश वैती यांनी सांगितले. हा भव्य दिव्य उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष अंकुश वैती, उपाध्यक्ष सुशील घरत, सचिव अशोक पाटील, खजिनदार रामकृष्ण पाटील,संजय गुरव,नंदकुमार पाटील, विजय पाटील,अनिल हेलेकर आदि विशेष मेहनत घेतात.

शिवराज्याभिषेक...एक विशेष आकर्षण

या वर्षी शिवराज्याभिषेक या विषयारील आकर्षक देखावा चितारण्यात आला असून यात शिवराज्यांचा जन्म, रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ, राज्याभिषेक, अफजल खानाचा वध, आग्रा भेट, पन्हाळ्याचा वेढा, आदी प्रसंग अगदी मोठ्या हुबेहूब रेखाटण्यात आले आहेत. प्रवेश द्वारावर छत्रपती शिवाजी महाराज्यांचा भव्य व रुबाबदार पुतळा उभारण्यात आला असून तो भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. असा हा शिवराज्याभिषेकाचा आकर्षक देखावा पाहण्यासाठी पहिल्या दिवसांपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी सुरु झाली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गरज ओळखून इमारती बांधण्याचे आयुक्तांचे निर्देश