ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
गणेशोत्सव मुहूर्तावर फुलांच्या दरात वाढ
वाशी : श्रावण मास सुरु होताच अनेक सण येतात ते दिवाळी साजरी करुनच संपतात. या सणांमध्ये फुलांना अधिक मागणी असते.यंदा मात्र पावसामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे.त्यामुळे फुलांच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ग्राहकांना वाढीव दराने हार, फुले विकत घ्यावी लागत आहेत. बाजारात झेंडू २०० रुपये किलो, शेंवती ३००-४०० रुपये किलो आणि गुलछडी १२०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
गणेशोत्सवात फुले, हार यांना अधिक मागणी असते. विशेषतः झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असते. पुणे, कोल्हापूर, सांगली येथे झेंडू फुलांची लागवड केली जाते. फुलांची लागवड केल्यापासून ते उत्पादन घेण्यासाठी दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे बागायतदार फुलांच्या मागणीनुसार या फुलांची लागवड करीत असतो. मात्र, पावसाने फुले भिजली आहेत. त्यामुळे झेंडू फुलांच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. गणेश पुजनासाठी तसेच नित्याने बाजारपेठेत झेंडू, शेवंती फुले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र गणेशोत्सवात अधिक मागणी असल्याने दरवाढ झाली आहे. बाजारात दोन दिवसांपूर्वी झेंडू प्रतिकिलो १२० रुपये उपलब्ध असलेला आता २०० रुपये तर शेवंती २०० रुपयांवरुन ३००-४०० रुपयांनी उपलब्ध आहे. गणेशोत्सवात गणरायासाठी फुलांच्या कंठीला विशेष महत्त्व आहे. गुलछडी फुलांच्या कंठीला जास्त मागणी असते. त्यामुळे गुलछडी फुल कंठी दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी ६०० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असेलेली गुलछडी आता १२०० रुपयांनी विक्री होत आहे, अशी माहिती घाऊक फुल विक्रेता शशिकांत शिंगोटे यांनी दिली आहे.
दरम्यान, फुले महागली असल्याने हरांचे दर देखील गगनाला भिडले आहेत. आधी १५०रुपयांना उपलब्ध असलेला हार आता ४००-५०० रुपयांवर पोहोचला आहे.