ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
‘गणेशोत्सव'साठी नवी मुंबई पोलीस सज्ज
नवी मुंबई : गणेशोत्सव-२०२४ निर्विघ्नंपणे आणि आनंदात साजरा व्हावा. तसेच गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेश भक्तांनी देखील गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.
येत्या ७ ते १७ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव नागरिकांना मोठ्याा उत्साहात साजरा करता यावा म्हणून नवी मुंबई पोलिसांनी देखील जय्यत तयारी केली आहे. गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर्षी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एवूÀण ८८६ सार्वजनिक आणि ९२,६०१ खाजगी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
१६ विसर्जन घाटांची निर्मिती...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परिमंडळ-१ मध्ये वाशी-जागृतेश्वर मंदिर तलाव, कोपरखैरणे खाडी तलाव, तुर्भे तलाव, नेरुळ-चिंचोली तलाव, करावे गाव तलाव, दारावे गाव तलाव, सीबीडी-आग्रोळी तलाव, ऐरोली नाका तलाव, रबाळे-ऐरोली येथील खाडी तलाव, दिघा तलाव याठिकाणी तर परिमंडळ-२ मध्ये कळंबोली-रोडपाली तलाव, खारघर-स्पॅगेटी तलाव, पनवेल-वडघर खाडी पनवेल, उरण विमला तलाव अशा एवूÀण १६ ठिकाणावर गणेश मुर्तींचे विसर्जन होणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच...
समाजकंटकांवर आणि समाजविघातक व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व गणेशमुर्ती विसर्जन घाटावर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याशिवाय गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील विशेष कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ‘विशेष शाखा'च्या उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी दिली.
चोख पोलीस बंदोबस्त...
गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ-१ मध्ये ८५० तर परिमंडळ-२ मध्ये ७४६ पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी ६ पोलीस उपायुक्त, १० सहाय्यक पोलीस आयुक्त, ६७ पोलीस निरीक्षक, २७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक-पोलीस उपनिरीक्षक तसेच ३१५० पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय स्ट्रायकिंग फोर्स-९, क्युआरटी-१, आरसीपी-१, एसआरपीएफ-१ तुकडी तैनात ठेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळे, विसर्जन स्थळे, मिरवणुकीचे मार्ग यावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांचे प्रशिक्षीत बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तैनात ठेवण्यात येणार आहे.
ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी पथक...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात ध्वनीप्रदुषण विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना ध्वनीमापक यंत्रे हाताळण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले असून ७५ डेसिबल पेक्षा कमी वाद्ये आणि ध्वनीक्षेपकाचा आवाज ठेवणे मंडळांना कायद्याने बंधनकारक आहे. यासंर्भात कारवाई करण्याच्या पध्दती (एसओपी) याबाबत पोलिसांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात पोलिसांचे जनजागृती उपक्रम...
गणेशोत्सव दरम्यान नवी मुंबई पोलिसांची टीम शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम संदर्भात जनजागरणाचे उपक्रम राबवणार आहे. ऑनलाईन फ्रॉडच्या गुन्ह्यात होत असलेली वाढ लक्षात घेऊन पोलिसांनी सदर पाऊल उचलल्याचे सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी सांगितले.
दरम्यान, गणेशोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी पोलीस ठाणे स्तरावर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या, डॉल्बी मालकांच्या बैठका घेऊन त्यांना प्रामुख्याने ध्वनीप्रदुषण रोखणे तसेच उत्सव शांततेत साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय शांतता कमिटी, मोहल्ला कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणशोत्सव मंडळांना विविध विभागाच्या परवानग्या एक खिडकी योजना अंतर्गत घेता यावेत यासाठी विविध पोलीस ठाण्यांकडून मंडळांना परवानग्या देण्याची कार्यवाही सुरु आहे.
गणेशोत्सव-२०२४ निर्विघ्नंपणे आणि आनंदात साजरा व्हावा तसेच गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेश भक्तांनी देखील गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत गणेशोत्सव साजरा करावा. नागरिकांना काही संशयास्पद आढळून आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
-संजय येनपुरे, सह-पोलीस आयुक्त, नवी मुंबई.