रेडीमेड मोदकांना ‘अच्छे दिन'

वाशी : लाडक्या बाप्पाचे आगमन एका दिवसावर येऊन ठेपल्याने सार्वजनिक मंडळांसह घरोघरी चैतन्य अवतरले असून, गणेशोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याला देखील मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. मोदक त्यापैकी प्रमुख असून, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मोदकाच्या विविध प्रकारांना वाढती मागणी असल्याने मोदक विक्रेत्यांना जणू गणपत्ती बाप्पा पावल्याची स्थिती आहे.

महाराष्ट्रात सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती बाप्पाला मोदक प्रिय असल्याने गणेशपजनात मोदकांना विशेष मान आणि स्थान असते. मात्र, आजच्या शहरी आणि धकाधकीच्या जीवनात गृहिणींना मोदक तयार करण्यास वेळ अपुरा पडत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून गृहिणी तयार मोदकांवर भर देत आहेत. त्यामुळे बाजारात खोबरे, मलई, चॉकलेट, आंबा, उकडी, खवा, पेढा, काजू ,शुगर फ्री मोदक, केक मोदक अशा विविध प्रकारांत रुचकर मोदक उपलब्ध होत आहेत. बाजारात मिळणारे मोदक अत्यंक सुबक आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने अशा मोदकांना भक्तांकडून वाढती मागणी दिसून येत आहे. त्यामुळे मोदक बनविण्याच्या उद्योगाला सध्या ‘अच्छे दिन' आले आहेत.

सेंद्रिय मोदकांना मागणी...

बाजारात सध्या सेंद्रिय मोदकही विक्रीला आले आहेत. या मोदकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर केलेला नसतो. असे मोदक आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असतात. सेंद्रिय मोदकांची जाहिरात सोशल मिडीयावर झळकत असल्याने या मोदकांना वाढती मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. सेंद्रिय मोदकांत हापूस आंब्याच्या रसापासून बनविलेल्या मोदकांचीही चलती आहे, अशी माहिती विक्रेत्या गौरवी ठसाले यांनी दिली.

रोजगाराच्या संधीत वाढ...

गणेशोत्सवात घरोघरी गणेशपुजेसाठी संपूर्ण १० दिवस मोदकांना मोठा मान असल्याने विविध व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मोदकांचे आगाऊ उत्पादन केलेले आहे. खवा, पेढा, आमरस, मलई, खोबरे या पदार्थांपासून तयार केलेल्या मोदकांना मोठी मागणी असल्याने कुशल कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. काही महिला गृह उद्योगांसह बचतगटांनाही मोदकांमुळे ‘अच्छे दिन' आले आहेत.

उकडीचे मोदक, तळलेले मोदक, क्लासिक मावा मोदक, पिनाकोलाडा मोदक, सतरंगी मोदक, मोका चॉकलेट मोदक, गुलाबी गुलकंद मोदक, ड्राय फ्रुट मोदक, मिरची पेरु मोदक, नटेला चॉकलेट मोदक, रेड वेलवेट मोदक, शुगर फ्री डायबेटिक मोदक, रसमलाई मोदक, ऑरेंज चॉकलेट मोदक बाजारात उपलब्ध आहेत.

त्यामुळे ऑनलाईन मोदक बनविण्याच्या प्रशिक्षणाकडे महिलांचा कल वाढत असून विविध प्रकारच्या मोदकाच्या रेसिपी अनेकांना मोफत शिकवले जात आहेत. तर काही महिलांनी युट्युब चॅनलवरील मोदक बनविण्याच्या पध्दती आणि मोदकाचे विविध प्रकार घरबसल्या शिकून घेतल्या आहेत.

मोदकांचे प्रकार दर (प्रति किलो रुपये)
ऑरेंज चॉकलेट मोदक ८००-१०००
खोबरे ८००-९००
मलई ६००-७००
चॉकलेट ८००-१०००
आंबा पलेवर ८००-९००
खवा ८००-१०००
पेढा ५००-६००
क्लासिक मावा मोदक ९००-१०००
रसमलाई मोदक ८००-१०००
शुगर फ्री मोदक ९००-१०००
केक मोदक १३०० ते १५००. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणपतीच्या मुहूर्तावर सिडकोची मेट्रो दर कपात