ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे महापालिका तर्फे पर्यावरण स्पर्धा विजेत्या संस्थांचा गौरव
ठाणे : ठाणे महापालिकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण कृती आणि जनजागृती स्पर्धेत गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था या ४ गटातील वेगवेगळ्या स्वरुपाच्या स्पर्धेत ७० जणांनी एकूण २६ लाख रुपयांची पारितोषिके जिंकली आहेत. ‘आंतराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन'चे औचित्य साधून या पर्यावरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि पर्यावरणपूरक चित्रपटांचा महोत्सवाचे आयोजन ४ सप्टेंबर रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते.
महापालिका आयुक्त सौरभ यांच्या निर्देशानुसार ७ सप्टेंबर ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन'चे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पर्यावरण स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
ठाणेची हवा चांगल्या गुणवत्तेची असावी यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्याला नागरिकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाली तर सदरचे उद्दीष्ट लवकर साध्य होईल. पर्यावरण स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आमचा हुरुप वाढवणारा आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.
याप्रसंगी अतिरिवत आयुवत रोडे यांच्यासह माजी नगरसेवक गुरुमुख सिंग, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त मनोहर बोडके, उप-प्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील, प्रदुषण नियंत्रण मंडळच्या स्नेहा कांबळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके, उपनगर अभियंता विनोद पवार, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, पर्यावरण दक्षता मंचाच्या अध्यक्ष डॉ. मानसी जोशी, विद्याधर वालावलकर, पोलीस निरिक्षक गौरी मोरे, आदि उपस्थित होते.
पर्यावरण स्पर्धेचे प्रयोजन...
राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान १.०' मध्ये ठाणे महापालिकेला अमृत शहराच्या गटात प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या रवकमेतून सदर पर्यावरण कृती आणि जनजागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील गृहसंकुले, खाजगी आणि महापालिकेच्या शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, महाविद्यालये यांनी सहभाग घेतला. त्यात सर्व ९ प्रभाग समिती स्तरावर गुणांकन करुन स्पर्धेतील गुणानुक्रमे ३ विजेते निवडण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.
स्पर्धेचे स्वरुप...
पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा, जनजागृती स्पर्धा अशा २ स्वरुपात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा संस्थात्मक पातळीवर तर जनजागृती स्पर्धा सर्व ठाणेकरांकरिता खुली होती. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, २१ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि ११ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात येत आहे. जनजागृती स्पर्धेकरिता महापालिका स्तरावर १ लाखाचे प्रथम पारितोषिक, ५१ हजाराचे द्वितीय आणि २१ हजार रुपयाचे तृतीय पारितोषिक देण्यात आले आहे. विवेक कोरलेकर, श्रीपाद भालेराव आणि सुरेश देशपांडे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. तर ‘पर्यावरण दक्षता मंच'तर्फे डॉ. जयश्री कुलकर्णी, संध्या टेंभे, अंजली दांडेकर, प्रिती काजरोलकर, मनिषा मोडक यांनी काम पाहिले.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ'तर्फे ७ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षाची संकल्पना स्वच्छ हवेसाठी गुंतवणूक अशी आहे. त्यानिमित्ताने ठाणे महापालिका तर्फे ‘मुख्यमंत्री हरित अभियान'मध्ये नुकतीच १ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली. तर स्मशानभूमींमध्ये महापालिकेने गॅसवर आधारित व्यवस्थाही विनामूल्य उपलब्ध करुन दिल्या आहेत. नागरिकांनी पर्यावरणपुरक जीवनशैलीचा स्वीकार करुन हवेची गुणवत्ता चांगली ठेवण्यास महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने अतिरिक्त आय़ुक्त रोडे यांनी केले.