पाणी प्रश्नावर शिवसेना उपशहरप्रमुखाचे अर्धनग्न आंदोलन

कल्याण : पुरेसा पाऊस पडून देखील कल्याण पश्चिम मधील काही प्रभागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. केडीएमसी प्रशासनाला वारंवार सांगून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने ‘शिवसेना शिंदे गट'चे उपशहरप्रमुख माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केडीएमसी मुख्यालयात आयुक्त कार्यालयाबाहेर अर्धनग्न होत ठिय्या मांडत आंदोलन केले.

खडकपाडा परिसरात असलेला पाण्याचा वॉल्व खाली दबला गेल्याने ठाणकर पाडा, बेतूरकर पाडा, शिवाजीनगर, काळा तलाव, आदि भागात पाणीपुरवठा होत नाही. याबाबत पाणी पुरवठा विभागाला, केडीएमसी आयुक्तांना वारंवार सांगून देखील या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन केल्याचे मोहन उगले यांनी सांगितले.

कल्याण पश्चिम मधील खडकपाडा येथे चौकात पाणी वितरणाचा वॉल्व असून याठिकाणाहून कल्याण पश्चिम मधील काही भागात पाणी वितरित करण्यात येते. सदरचा वॉल्व खाली दबला गेला असून पाणी वितरित करताना संबंधित वॉल्वमन कडून खडकपाडा परिसरातील इमारतींच्या भागाला झुकते माप देऊन जास्त पाणी पुरवठा करण्यात येतो. तर वॉल्व दबलेला असल्याने ठाणकरपाडा, बेतूरकर पाडा, शिवाजीनगर, काळा तलाव या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असून सदरचा दबलेला वॉल्व दुरुस्त करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने मोहन उगले यांनी ४ सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालयाबाहेर अर्धनग्न होत ठिय्या मांडत आंदोलन केले.      

दरम्यान, याबाबत आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येणार असून संबंधित कनिष्ट अभियंत्यांचे निलंबन करण्याची आपली मागणी असल्याचे मोहन उगले यांनी यावेळी सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘मनसे'या लढाईला आणखी एक यश