पनवेल शहर विकास आराखड्याबाबत जनसभा संपन्न
पनवेल : युवा संस्था आणि घर हक्क संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर मधील युवा सेंटरमध्ये पनवेल शहर विकास आराखड्याबाबत आयोजित जनसभेत झोपडपट्टी पुनर्वसनासह, आदिवासी पाडे, गावठाणांसंबंधीचे प्रश्न, सार्वजनिक सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या ‘जनसभा'मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पनवेल शहराच्या विकासासाठी आपले मत मांडून त्यावर कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले.
पनवेल शहर विकास आराखडा संदर्भात युवा संस्था आणि घर हक्क संघर्ष समिती यांनी ३१ ऑगस्ट रोजी खारघर येथील ‘युवा सेंटर'मध्ये ‘जनसभा'चे आयोजन केले होते. या जनसभेत विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ञ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या ‘जनसभा'ची सुरुवात ‘युवा संस्था'च्या वतीने दिशांत आणि दुलरी यांनी पनवेल विकास आराखड्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या जमिनीचे वर्गीकरण आणि पनवेल महापालिकेने त्यावर केलेल्या आरक्षणाच्या नियोजनाचे सोप्या भाषेत विश्लेषण केले. यात सार्वजनिक सुविधांची कमतरता, झोपडपट्टी पुनर्वसन आणि सार्वजनिक गृहनिर्माण योजनांमधील तफावत तसेच आदिवासी पाडे आणि गावठाणांसंबंधीच्या मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
‘जनसभा'च्या दुसऱ्या सत्रात आयोजित पॅनल चर्चेत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल विकास आराखड्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना सिडको, एमआयडीसी, आणि महपालिकेच्या राजकीय हस्तक्षेपामुळे स्थानिकांच्या सहभागाशिवाय झालेल्या विकास प्रक्रियेची नकारात्मक बाजू मांडली. त्यांनी पनवेलकरांना सामाजिक सुविधांसाठी जागरुकपणे सूचना-हरकती सादर करण्याचे आवाहन केले. नगररचनाकार प्राची मर्चंट यांनी विकास आराखड्यामध्ये सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगत तांत्रिक दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
‘आगरी-कोळी युथ फाऊंडेशन'चे अध्यक्ष निलेश पाटील यांनी गावठाणांच्या समस्यांवर प्रकाश टाकत त्यांच्या रक्षणाची आवश्यकता व्यक्त केली. तानाजी पाटील यांनी मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची चर्चा करत, सर्वांनी सक्रियपणे सूचना सादर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मारुती म्हात्रे यांनी असंघटित कामगार आणि फेरीवाल्यांच्या अधिकारांवर लक्ष केंद्रित केले, तर ॲड. जे. पी. खरगे यांनी नागरिकांच्या व्यापक सहभागाची गरज स्पष्ट केली. आदिवासी कातकरी समाजाच्या वाड्याच्या धोक्यात आलेल्या स्थितीबद्दल एकनाथ वाघे यांनी चिंता व्यक्त करत सर्वांना जागरुक करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगितले.
यावेळी ‘जनसभा'चे अध्यक्ष हिरामण पगार यांनी सूचना-हरकती यासाठी मुदतवाढ न दिल्यास पनवेल महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. सदर सभेत ‘रिपब्लिकन सेना'चे उपाध्यक्ष खाजाँमिया पटेल, कैलास सरकटे, कलावती माळी, सुनिता ताई आदिंनी आपले विचार मांडले. या ‘जनसभा'ला पनवेल विभागातील नागरिक, कामगार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची रुपरेषा आणि प्रास्ताविक राजू वंजारे आणि सुजित निकाळजे यांनी केले. तर अजय बोरकर, रेश्मा साखरे, विद्या रामुगडे, मंगेश कांबळे, विजय खरात यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.