मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
वारंवार बिलाचा तगादा लावल्याने नवजात जुळ्या बालकांच्या पित्याने केली आत्महत्या
नवी मुंबई : नरेंद्र प्रल्हाद गाडे या इसमाच्या पत्नीला तब्बल १५ वर्षांनंतर जुळी मुले झाली. त्यांची पत्नी तेरणा हॉस्पिटल, नेरूळ येथे उपचार घेत होत्या. एवढा मोठा आनंद गाडे दाम्पत्याला झालेला असताना हॉस्पिटल प्रशासन नरेंद्र गाडे यांच्याकडे बिल भरण्यासाठी सतत तगादा लावत होते. सातत्याने गाडे यांना अपमानास्पद वागणूक देत होते. गाडे यांनी जवळपास ८०% बिल भरले होते. बिल भरण्यासाठी गाडे यांचा मानसिक छळ करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. या तणावातून नरेंद्र गाडे यांनी २७ जुलैला आत्महत्या केली. या संदर्भात गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली.
मुळात हे हॉस्पिटल धर्मादाय (चॅरिटी) संस्थेचे सर्व फायदे घेते. या हॉस्पिटलला मिळालेली जमीन ही कवडीमोल दराने चॅरिटी करण्याच्या हेतूने दिलेली आहे. अशा वेळी आर्थिकदृष्ट्या कमजोर रुग्णांना नियमाप्रमाणे सवलतीच्या दरात सेवा देणे बंधनकारक आहे. अशी सेवा नरेंद्र गाडे यांच्या पत्नीला का दिली नाही ? हॉस्पिटल प्रशासनाने नरेंद्र गाडे यांना आत्महत्या करण्यास का प्रवृत्त केले ? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. तरी आपण तेरणा हॉस्पिटल व नवी मुंबईतील सर्व धर्मादाय संस्थेचे लाभ घेणारे हॉस्पिटल धर्मादाय संस्थेचे नियम काटेकोरपणे पाळतात की नाही याचे ऑडिट करावे. नियम न पाळणाऱ्या हॉस्पिटलवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी केली.
बिल भरले नाही तर बाळाचे व्हेंटीलेटर काढू अशी धमकी तेरणा प्रशासनाने दिली. या तणावातून बाळाच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यामुळे तेरणा हॉस्पिटलने नरेंद्र गाडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले याकरिता या हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा. अशी मागणी ही निवेदनाद्वारे सचिन कदम यांनी आयुक्त शिंदे यांच्याकडे केली.
त्याचप्रमाणे धर्मादाय हॉस्पिटलच्या बेड बाबत माहिती सगळ्या हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावावी. तसेच विविध उपचार, शस्त्रक्रिया यांचे दरपत्रक महानगरपालिकेने ठरवावे व ते हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावावे, अशी मागणी सुद्धा मनसे शिष्टमंडळाने केली. पालिकेने यावर तात्काळ ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर मनसे यावर जन आंदोलन करेल असा इशारा मनसे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला.
मनसेच्या या शिष्टमंडळात उप शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, पालिका कामगार सेना शहर संघटक आप्पासाहेब कौठुळे, विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, विभाग अध्यक्ष निखिल गावडे, उपविभागअध्यक्ष मंगेश पाटील, शाखा अध्यक्ष अतिश पाटील, शाखा अध्यक्ष गणेश पाटील, वाहतूक सेना चिटणीस विष्णू कांबळे, मनविसे उपविभागअध्यक्ष मयंक घोरपडे, विष्णू कांबळे, अविनाश फाळके, संदेश पेडणेकर, जालिंदर चव्हाण व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.