केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना आणि प्रधानमंत्री पदविक्रेतानिधी योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र अव्वल
नवी मुंबई : गृहनिर्माण-शहरी कार्य मंत्रालय यांच्याद्वारे दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, शहरस्तरीय संघ आणि राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीकरिता पीएम स्वनिधी - २०२३-२४ अंतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याला जाहीर झाला.
१८ जुलै रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या उत्कृष्टता की और बढते कदम या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण-शहरी कार्य मंत्री मनोहर लाल, राज्यमंत्री तोखन साहू, सचिच अनुराग जैन, सहसचिव राहुल कपूर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे राज्य अभियान संचालक तथा नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुवत-संचालक मनोज रानडे यांनी स्वीकारला.
महाराष्ट्र राज्याच्या सहाय्याने ८.०७ लक्ष पथविक्रेत्यांना सन २०२१ पासून आजतागायत ८०५ कोटी रुपये रक्कमेचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. शिवाय दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्पार्क 2023-24 आणि प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पीएम स्वनिधी 2023-24 या दोनही उपक्रमांमधील महाराष्ट्राच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत केंद्रीय गृहनिर्माण-शहरी कार्य मंत्रालयाने तब्बल ८ पुरस्कार देऊन महाराष्ट्राचा गौरव केला आहे.
दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था पवनी नगरपरिषद,मालेगाव महापालिका, चंद्रपूर महापालिका, नाशिक महापालिका, नागपूर महापालिका आहेत. तर प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था मंगळवेढा नगरपरिषद, आणि सोलापूर महापालिका आहे. तसेच नाविन्य शहर स्तरीय संघ या पुरस्कारासाठी चंद्रपूर महापालिकेला पुरस्कार देण्यात आला आहे.
सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्याील नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशीला पवार, नगरपरिषद प्रशासन संचालनालयचे सह-आयुवत शंकर गोरे, अवर सचिव अनिलकुमार उगले, सहा. आयुक्त माधुरी मडके, संबंधित महापालिका-नगरपरिषद यांचे आयुक्त, मुख्याधिकारी तसेच राज्य अभियान व्यवस्थापक आणि सदर योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.