नवी मुंबई विमानतळावर सिग्नल चाचणी

नवी मुंबई : पनवेल जवळ उभारल्या जात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून १७ जुलै रोजी प्रथमच सिग्नल चाचणी घेण्यात आली. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता नजरेच्या टप्प्यात आले आहे. दरम्यान, सदर चाचणीचा अहवाल एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाच्या मुख्यालयाला पाठविण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम पाच टप्प्यात केले जाणार आहे. यातील पहिले दोन टप्पे एकत्रित पूर्ण केले जाणार असून यात टर्मिनल आणि एका धावपट्टीचा (रनवे) समावेश आहे. मार्च २०२५ पर्यंत विमान टेकऑफ घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले केले जाणार आहे.

दरम्यान, नुकतीच १३ जुलै रोजी केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री किंगरापू नायडू आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी ना. किंगरापू नायडू यांनी मार्च २०२५ पासून नवी मुंबईतून विमानोड्डाण होणार असल्याचे जाहीर केले होते. त्याअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून १७ जुलै रोजी नवी मुंबई विमानतळावर प्रथमच सिग्नलची चाचणी घेण्यात आली. यावेळी विमानतळ प्राधिकरणाच्या विशेष विमानाने चाचणी घेण्यात आली.

विमानतळावरील धावपट्टीवर विमान उतरताना आणि उड्डाण करताना कोणता अडथळा तर येत नाही ना? याची प्रथमच चाचणी घेण्यात आली. यावेळी विमानोड्डाण पाहण्यासाठी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांनी या चाचणीचे क्षण आपल्या मोबाईल आणि कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा मोहीम