पातलीपाडा येथील महापालिका शाळेची आयुक्तांकडून पाहणी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. या शाळेच्या इमारतीची प्रस्तावित दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पातलीपाडा येथे शाळेची तळमजला अधिक २ मजले अशी इमारत आहे. या इमारतीत महापालिकेची शाळा क्र.२१, २५, ५३ आणि ५४ यांचे वर्ग भरतात. या सर्व शाळांची एकत्रित पटसंख्या १,६०० आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव वर्ग खोल्यांची मागणीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ११ जुलै रोजी संपूर्ण शाळेची पाहणी केली. या पाहणी प्रसंगी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार, उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार, कार्यकारी अभियंता संजय कदम, भगवान शिंदे, आदि उपस्थित होते.

आयुक्त राव यांनी शाळेच्या सर्व मजल्यांची पाहणी केली. इमारतीच्या गच्चीवर करण्यात आलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्त राव यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा केली. यानंतर शाळा इमारतीच्या दुरुस्तीचा सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

शाळेच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता, काँक्रिटीकरण ताबडतोब करण्यात यावे. शौचालयांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. तळमजल्यावरील काही भिंतींना ओल आलेली आहे. पाण्याचा प्रश्न असून इमारतही जुनी झालेली आहे. सर्व समस्या लक्षात घेऊन शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा सर्वंकष प्रस्ताव तयार करावा. त्यात, सिव्हील, पाणी पुरवठा, विद्युत यंत्रणा, वाढीव वर्ग खोल्या, इमारतीची आवश्यक डागडुजी यासारख्या सर्व कामांचा अंतर्भाव करण्यात यावा.
-सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 भाजीविक्रेत्या महिलेचा मुलगा सीए