अखेर मुर्बी ग्रामस्थांच्या लढ्याला यश

खारघर :  सिडको तर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे मार्गावरील सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकात सेंट्रल पार्क-मुर्बीपाडा नावाचा फलक  लावण्यात आला आहे. मुर्बी ग्रामस्थांच्या लढ्याला यश आल्यामुळे मुर्बी ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.

‘सिडको'ने नवी मुंबई मेट्रो रेल्वे (बेलापूर ते पेंधर) मार्ग उभारणीचे काम सुरु केल्यावर बेलापूर-पेंधर मार्गावर अकरा मेट्रो रेल्वे स्थानक उभारणीचे काम सुरु असताना मुर्बी गावालगत असलेल्या मेट्रो स्थानकाला मुर्बीपाडा असे नाव देण्यात यावे, या मागणीचे पत्र २०१४ मध्ये ‘ओवा ग्रामपंचायत'ने ठराव करुन सिडको प्रशासनाला दिले होते. तसेच नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु होण्यापूर्वी ‘सिडको'ने रेल्वे स्थानकाला मुर्बीपाडा नाव न देता सेंट्रल पार्क असे नाव दिले. दरम्यान, २०२१  मध्ये मुर्बी ग्रामस्थांकडून ‘सिडको'कडे सेंट्रल पार्क ऐवजी मुर्बीपाडा रेल्वे स्थानक नाव देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु होण्यापूर्वी मुर्बी ग्रामस्थांनी सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकावर एक दिवसीय उपोषण केले होते. या उपोषण आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर, तत्कालीन  आमदार  बाळाराम पाटील, कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर, माजी पनवेल महापालिका स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्यासह मुर्बी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, ‘सिडको'ने सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्थानकाला मुर्बीपाडा असे नाव देण्याचे आश्वासन देवून गेल्या जानेवारी महिन्यात लेखी पत्र देखील दिले होते. नुकतेच ‘सिडको'ने सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकावर सेंट्रल पार्क - मुर्बीपाडा असे नाम फलक लावल्यामुळे मुर्बी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

‘सिडको'ने सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्थानकाला सेंट्रल पार्क-मुर्बीपाडा असे नाव दिल्यामुळे मुर्बी ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत. मुर्बीपाडा नावामुळे मुर्बी गावची ओळख कायम असणार आहे. सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्थानकाला सेंट्रल पार्क-मुर्बीपाडा असे देण्यात आले नाव म्हणजे सर्व ग्रामस्थांच्या एकत्रित लढ्याचे यश आहे. -  मनेश पाटील, ग्रामस्थ - मुर्बी गाव, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘नगरपरिषद-नगरपंचायत कर्मचारी-संवर्ग संघर्ष समिती'तर्फे लाक्षणिक उपोषण