ज्वेलर्सची १३ लाखांची रक्कम लुटणारी तोतया पोलिसांची टोळी जेरबंद  

सीबीडीः कमी किंमतीत सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने मुलुंड येथील ज्वेलर्स मालकाला खारघर येथे बोलावून घेत त्याला सोने न देता पोलीस असल्याचे भासवून कर्मचाऱ्याकडून १३ लाखांची रोख रक्कम लुटून पळून गेलेल्या ७ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून सदर गुह्यात वापरलेली वाहने आणि काही रोख रक्कम हस्तगत केली आहे. सदर टोळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.  

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राज उर्फ मोहमंद आसिफ मोहमंद गालिब शेख (४०), विशाल बाजीराव तुपे (२१), रोहीत राजाराम शेलार (२६), निलेश बाळू बनगे (२६), शिवाजी मारुती चिकणे (३६), विशाल गणपत चोरगे (३६) आणि दिलेर साजीद खान (४६) या ७ जणांचा समावेश आहे. या टोळीने जून महिन्यामध्ये मुलुंड येथे राहणाऱ्या सुनिल इंगळे याला कमी किंमतीत सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर सुनिल इंगळे याने मुलुंड येथील ज्वेलर्स चालक रविंद्र चौधरी यांना सांगितले असता, २६ जून रोजी दुपारी सुनिल इंगळे, रविंद्र चौधरी आणि त्यांच्याकडे कामाला असलेल्या रतनसिंग राठोड असे तिघेजण १३ लाख रुपये घेऊन खारघर येथे गेले होते.  

यावेळी सदर टोळीने तिघांना खारघर येथील कोपरा गावाजवळ बोलावून घेतल्यानंतर तेथे पांढऱ्या रंगाच्या इर्टीगा कारमधून आलेल्या तिघा लुटारुंनी पोलीस असल्याचे भासवून रतनसिंग राठोड याला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून त्याला कोपरा गांव येथील हायवे ब्रेक हॉटेल जवळ नेले. त्यानंतर त्यांनी रतनसिंग राठोड याला मारहाण करुन त्याच्या जवळ असलेली १३ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पलायन केले होते. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्यासह ३ पथके तयार करण्यात आली.  

या पथकाने सतत दोन दिवस केलेल्या तांत्रिक तपासात सदर गुन्ह्यातील आरोपींनी इर्टीगा कारवर बनावट नंबर पलेट लावून सदरचा गुन्हा केल्याचे तसेच इतर आरोपी दोन मोटारसायकलवरुन घटनास्थळी आल्याचे आढळून आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यातील एका मोटारसायकलचा नंबर मिळवला. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळावर संकलीत केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा ८ ते १० आरोपीनी संगनमताने केला असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या ३ पथकाने डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई परिसरामध्ये एकाच वेळेस छापेमारी करुन ७ सराईत आरोपींना अटक केली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एका रात्रीत करोडपती होण्याच्या नादात नागरीकांची होत आहे फसवणुक