कोंडेश्वर धबधबा
बदलापूर कर्जत रस्त्यावरील कोंडेश्वर धबधबा हे पर्यटकांचे अतिशय लाडकं स्थान आहे. पण हा इतका सुंदर धबधबा, थोडा कुप्रसिध्द आहे. पावसाळा सुरु झाला की इथे कायम अपघात होतात आणि अपमृत्यूच्या बातम्या वर्तमानपत्रात येत असतात.
मला आठवतं कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे १९८० साली वगैरे असेल, मैत्रिणींसोबत उल्हासनगरहून त्या दिवशी आम्ही धबधब्यावर फिरायला गेलो. आमच्या देखत एकजण बुडत होते, ओरडत होते. बुडणारा काका मला वाचवा असं म्हणत होता आणि बघता बघता पाण्याखाली गायब झाला. त्याला वाचवायला, पुतण्याला वाचवायला अन्य व्यक्ती पाण्यात उतरली होती. त्यात एकाचा तिथे मृत्यू बघितला. आम्ही खूप घाबरलो वयाने लहान होतो. काका मला वाचवा असं का म्हणत असतील, हे त्या क्षणाला मला थोडंसं जाणवलं .
ते सगळं बघण्याच्या नादात आम्ही घरी फोन करायला विसरलो की आम्ही व्यवस्थित आहोत. ( त्या काळात मोबाईल फोन नव्हते). सगळीकडे बातमी पसरली होती .त्यामुळे लोक काळजी करत होते. घरचे काळजी करत होते. मुंबईला आमचे आई वडील पण काळजी करत होते. तेव्हाही तो धबधबा सहजासहजी पोहोचता येईल असा नव्हता. रस्ता थेट नव्हता. वाकडेतिकडे रस्त्याने जावं लागायचं. त्या पायवाटेवरूनसुद्धा पाय घसरण्याची भीती होती. तो धबधबा खतरनाकच होता आणि अधिकाधिक प्रसिद्ध होऊ लागला होता. लोकप्रिय झाला होता. बिन पैशाची करमणूक म्हणून माणसं नदी धबधबे तलाव यांच्यात टाईमपास करायला उतरतात. पाण्याचे खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडु शकतात.
पाणी आणि आग यांच्याशी खेळू नये ते आस लावते, बोलावते, जीव घेते असे बुजुर्ग सांगतात. पण तरी अनामिक आकर्षणाने माणूस, आई वडिलांची नजर चुकून न सांगता सहलीला जातो. जिथे नियतीने लिहिलं असेल तिकडे जातो. नंतर आम्ही बदलापूरला राहायला आलो. नवी मोटरसायकल घेतली होती. कोंडेश्वरला गेलो. आत पाण्यात जायचा विचार होता.पण कडेकडेने फिरलो. तेव्हा कोंडेश्वर धबधब्याजवळ एक एकदम वृद्ध गृहस्थ, साधूसारखा दिसणारा इसम राहायचा. तो त्या धबधब्यात, पावसाळा असतांना, अति पाणी असतांना कोणी उतरलं की, पंचा सावरत धावून यायचा. आणि सांगायचा या पाण्यात उतरू नका, हे कुंड जीव घेते. त्यांनी आम्हालाही असं सांगितल्यावर आम्ही एकमेकांकडे बघू लागलो पाण्यात उतरलो नाही. आजूबाजूला थोडे रेंगाळलो हात पाय धुतले आणि परत आलो. रस्त्यापर्यंत चालत आल्यावर चौकशी केली असता, बाजूला वावरणारे वृद्ध लोक सांगु लागले असे ऐकिवात आहे की, त्या साधुचा तरुण मुलगा त्या कुंडात बुडाल्यामुळे, ते साधु तिथेच राहतात आणि लोकांना, उंचावरुनखाली बुडी घेणाऱ्या, लोकांना सावध करतात.एवढ्यात मी एक दोन वर्षांपूर्वी त्या कोंडेश्वरपाशी गेले होते. तेव्हा ते वृद्ध गृहस्थ तिथे नव्हते. मी अनेक वर्षानंतर आले होते. पूर्वीपेक्षा आता धबधब्याजवळ पोहोचणं सोपे झाले. लोकल ट्रेनची फ्रिक्वेन्सी पण वाढली आहे. रिक्षा आहेत. वस्तीपण वाढली आहे, असं मला वाटलं. त्यामुळे कदाचित, विनामूल्य करमणूक या कारणामुळे गर्दी होत असेल आणि सामान्य लोक पाण्याची ओढ लागून तिकडे जात असतील.
ठोसेघर धबधबा, अलिबागला कुलाबा किल्ल्यापाशी देखील असे अपघात वारंवार होतात; पण तिथे मोठमोठे बोर्डस लावलेले आहेत आणि तिथे आजूबाजूला दुकानदार, नारळ विकणारे, प्रवासी बसणारे टांगे चालवणारे, होडी वल्हवणारे लोकदेखील ताबडतोब मदतीला धावून येवू शकतात.पण रिस्क घ्यायची कशाला?
विविध कारणाने शहाड बिर्ला मंदिर, अंबरनाथ शिवमंदिर आणि त्यापुढे कोंडेश्वर धबधबा, अशी सहलीची योजना माणसं सहज करतात. कोंडेश्वर धबधब्यावर असं बळी जाणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठा आहे. कोंडेश्वर धबधबा सुंदर आहे, तिथे गेल्यावर पाण्यात उतरायचा मोह होतो हेदेखील मान्य आहे कदाचित माझा हा लेख ऐकल्यावर वाचल्यावर तुम्हाला सुद्धा कोंडेश्वर धबधबा बघायला जावंसं वाटेल जायला हरकत नाही पण सुरक्षितता महत्त्वाची आहे. मी वर जे सांगितलं,हे तर नुसतं भावनाप्रधान वर्णन झालं. पण उपाय काय करावे?
१ जिथे खोल पाण्याचा अंदाज न येणे एवढे खड्डे आहेत त्या भागात जाऊ नये म्हणून तिथे जाळी लावावी.
२ या खड्ड्यात बुडून या धबधब्यापाशी अनेक वृत्ती होतात सावध राहावं असा बोर्ड लावावा.
३ लाईफ गार्ड किंवा जीवन सुरक्षारक्षक तज्ञ होणारी व्यक्ती नेमावी.
४ एखादी चहा पाण्याची टपरी तिथे लावावी. जेणेकरून पर्यटक आत गेले, त्यातले कोण परत आलं,कोणी परत आलं नाही, याकडे नकळत लक्ष राहील.
५ पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करणेदेखील आवश्यक आहे. स्वर्ग सुखाचा आनंद घेता घेता डायरेक्ट स्वर्गलोकी जायची वेळ येऊ नये याची काळजी घ्यावी.
मित्र मैत्रिणींनो, सहल करा, मजा करा. पण घरी आपले आई-वडील किंवा जवळच कोणीतरी वाट बघत आहे, याची जाणीव ठेवा. - शुभांगी पासेबंद