पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील

शाळांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्याची सूचना

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार संघटना, स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. सदर सर्वांच्या सहकार्याने गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करु शकतो, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकार, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण पर्यावरणपुरक गणेशोत्सव नियमावली-२०२४ मार्च महिन्यात प्रसिध्द केली आहे. सर्व मूर्तीकार, मूर्ती विक्रेते यांना त्यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था, तज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. सदरचे प्रयत्न असेच सुरु ठेवून जास्तीत जास्त संवाद साधला जावा, असे आयुक्त राव यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

महापालिकेतील विभागप्रमुखांची आढावा बैठक ८ जुलै रोजी नागरी संशोधन केंद्र येथे झाली. सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण विभागाने सक्रियपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक उपक्रम करावेत. महापालिकेच्या शाळा आणि इतर शाळांमध्ये एकाच दिवशी त्यासंदर्भात उपक्रमाचे आयोजन करावे. त्यात नाटिका, स्पर्धा, रांगोळी अशा कोणत्याही स्वरुपात विद्यार्थी आणि शिक्षक यांना व्यक्त होण्याची मोकळीक द्यावी. या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घरोघरी जाईल. तसेच, भविष्यातील नागरिकांच्या मनात त्याविषयी आत्मियता निर्माण होईल. त्यादृष्टीने पर्यावरण विभाग, शिक्षण विभाग यांनी नियोजन करावे, असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, गणेशोत्सव मंडळांची संघटना, मूर्तीकारांची संघटना यांना एकत्र आणून त्यातून सदर उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्याच्या मार्गातील समस्या, अडचणी जाणून घ्याव्यात. म्हणजे त्यावर तोडगा काढता येईल.
-सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका.

कांदळवनावरील भरावाबाबत आक्रमक व्हा...

कोलशेत-बाळकुम परिसरातील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीलगत कांदळवनावर भराव टाकण्यात आला आहे. या भागाची पाहणी केल्यानंतर तेथे मोठी वाहने जाऊ नयेत, यासाठी चर खणण्यात आले आहेत. ‘कांदळवन'च्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेनेही मोठी वाहने या भागात प्रवेश करु नयेत यासाठी उंच वाहन अवरोधक बसवले आहेत. आता सदरचा भराव काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे. वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याशीही येथील परिस्थितीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

‘कांदळवन'वरील सदर भराव काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने आक्रमक व्हावे. आपल्या कृतीतून या संवेदनशील विषयाबाबत महापालिकेची आक्रमक भूमिका दिसली पाहिजे. त्यासाठी ३ दिवसात आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढील ३ महिन्यात करायचा कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.

स्वाईन पलू बद्दल सतर्क रहा...

ठाणे महापालिका क्षेत्रात जूनपासून स्वाईन पलूच्या (एच-१ एन-१) रुग्णांची संख्या ७० इतकी आहे. गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते. परंतु, स्वाईन पलूच्या (एच-३ एन-२) रुग्णांची संख्या ८७ होती. सदरची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी. औषधांची उपलब्धता ठेवावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन पलूच्या रुग्णासाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डीपीएस फ्लेमिंगो तलाव लवकरच सुरक्षित