‘एनडीआरएफ'तर्फे नमुंमपा कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

नवी मुंबई : जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नमुंमपा मुख्यालयात करण्यात आले होते.

याप्रसंगी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ, ‘नमुंमपा'चे आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुख तथा प्रशासन विभागाचे उपायुवत शरद पवार, ‘यशदा'चे मुख्य प्रशिक्षक योगेश परदेशी, ‘एनडीआएफ'चे निरीक्षक जालिंदर फुंडे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना उपायुक्त  शरद पवार यांनी कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, त्यामुळे नेहमी सतर्क राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने ‘ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण'च्या माध्यमातून सदर विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कोणत्याही आपत्तीत एनडीआरएफ जवान ज्या समर्पित भावनेने नियोजनबध्द मदतकार्य करतात, ते स्पृहनीय आहे. ‘एनडीआरएफ'मार्फत मिळणारे प्रशिक्षण नवी मुंबईतील शहर आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयोगी ठरेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

पूर, भूकंप, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सुनामी, इमारत कोसळणे, दरड कोसळणे, वायू अथवा रासायनिक गळती, अपघात अशा आपत्तीच्या प्रसंगी एनडीआरएफ कशा प्रकारे कार्यवाही करते, याची विस्तृत माहिती देत ‘एनडीआरएफ'चे निरीक्षक जालिंदर फुंडे यांनी ‘एनडीआरएफ'ची मदत कुठे घेता येऊ शकते, यावर भाष्य केले.

२००५च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपत्तीबाबत कार्यवाही केली जात असल्याची माहिती देत फुंडे यांनी विविध प्रकारच्या आपत्तींची आणि त्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारी, कार्यवाहीची सादरीकणाद्वारे माहिती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींची बाबनिहाय माहिती देत आपत्ती आधी, आपत्ती प्रसंगी आणि आपत्ती नंतर करावयाच्या सुरक्षित कार्यवाहीविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच आपल्या सहकाऱ्यांसह प्रात्यक्षिके दाखविली.

आपत्तीप्रसंगी कोणतेही शासकीय मदतकार्य पोहोचेपर्यंत घरातल्या टाकाऊ अशा साध्यासाध्या वस्तुंपासून आपत्तीप्रसंगी बचाव करणारे साहित्य सहजपणे बनवता येऊ शकते, याबद्दलची माहिती देत जालिंदर फुंडे यांनी अशी साहित्य प्रदर्शितही केली. यावेळी आपत्तीप्रसंगी प्राथमिक स्वरुपात आरंभी करावयाच्या मदतकार्याची प्रात्यक्षिकेही एनडीआरएफ जवानांनी सादर केली.

नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, स्वच्छता मित्र, सुरक्षारक्षक तसेच शासनाच्या महसूल विभागातील कर्मचारी यांनी सदर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील