खड्ड्यांमुळे ‘ठाणे'मध्ये वाहतूक कोंडी  

ठाणेः ठाणे शहरामध्ये सुरुवातीच्या पावसाने उडवली दैना उडाल्याचे आणि खड्ड्यांमुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र ८ जुलै रोजी पहावयास मिळाले. ७ जुलै रोजीच्या रात्रीनंतर झालेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले असून सुरुवातीच्या पावसाने अशी स्थिती निर्माण केली आहे तर आणखी काही दिवसांनी काय होईल? असा प्रश्न ठाणेवासिय करीत आहेत. तर पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा आलेख वाढत चालल्याचा आरोप ‘मनसे जनहित-विधी विभाग'चे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.

पावसाळ्यात घोडबंदर रस्ता आणि खड्डे नेहमीचे समीकरण बनले आहे. अनेक अपघात होत असतानाही आणि याच जिल्ह्याचे मुख्यमंत्री असतानाही अद्यापही घोडबंदर रस्त्याचा दर्जा सुधारण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्याचा सूर स्थानिक जनतेतून ऐकू येत अहे. घोडबंदर रस्ता राज्य महामार्ग असून सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, मेट्रो प्रकल्प तसेच ठाणे महापालिका यांच्या माध्यमातून देखभाल केली जाते. सेवा रस्ता ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येतो. केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी घोडबंदर रस्त्यावरील दुरावस्थेमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून घोडबंदरवर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यामुळेच पावसाळ्यात जीवितहानी होते, यास प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.

खड्ड्यांमुळे राज्य मार्गावर वाहतूक कोंडी...

घोडबंदर रस्ता राज्य महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. याचबरोबर पनवेल, जेएनपीटी, नाशिक ,अहमदाबाद, राजस्थान येथे जाणारी मोठा प्रमाणावर अवजड वाहने देखील याच महामार्गावरुन ये-जा करत असतात. त्यामुळे येथील रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सर्व प्राधिकारणांची असून देखील प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ठाणेकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सदर मार्गावरील अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. घोडबंदर रोड दरवर्षी खड्डेमय होत असल्याचे प्रमुख कारण संबंधित प्राधिकरणामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. तर ठाणेकर जनता मात्र वाहतूक कोंडीत घुसमटत असल्याची प्रतिक्रिया व्यवत करीत आहे.
 
घोडबंदर रस्ता राज्य महामार्ग असून याचे देखभाल-दुरुस्तीचे काम एका प्राधिकरणाच्या माध्यमातून झाले पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने या संबंधित क्षेत्रात येणारे रस्ते महापालिकेला हस्तांतरण करुन त्यांनी ते सांभाळणे, असे सूचित करण्यात आले आहे. मात्र, तरीही सदर कामे केली जात नसल्याचे समोर येत असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे.
-स्वप्नील महिंद्रकर, अध्यक्ष-मनसे जनहित-विधी विभाग, ठाणे शहर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुसळधार पावसाने पनवेल तालुक्याला झोडपले