आपत्ती व्यवस्थापन कार्याचा महापालिका आयुक्तांकडून आढावा

पनवेल : महापालिका कार्यक्षेत्रात ६ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसाळधार पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी पाणी साठले, त्या मागील कारणमीमांसा महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्यालयात आढावा बैठकीत करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी पाणी तुंबण्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेशित केले.

सदर बैठकीस सहाय्यक संचालक (नगररचना) ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे,  उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त मारुती गायकवाड, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

६ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कळंबोलीमध्ये विविध ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. वास्तविक पाहता कळंबोली भाग समद्रीसाटीपासून खाली आहे. इतरवेळी पाऊस जास्त आल्यास, पाणी पंपाच्या साह्याने धारण तलावामध्ये सोडण्यात येते. धारण तलावामधील पाणी खाडीमध्ये सोडण्यात येते. परंतु, ७ जुलै रोजी समुद्राला भरती असल्याकारणाने आणि याचवेळी पाऊस जास्त आल्याने खाडीमध्ये पाणी सामावून घेतले गेले नाही. पाणी पुन्हा मागे आले आणि कळंबोलीतील सखल भागात सर्वत्र पाणी साठले.

सदर समस्येवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पाणी तुंबण्याच्या कारणांचा आढावा आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतला. तसेच यावेळी ‘सिडको'च्या ताब्यातील मलनिःस्सारण केंद्रामधील ७ पंप पैकी ४ पंप सुरु होते. त्यामुळे नागरिकांच्या शौचालयामधून घरांमध्ये पाणी आले असल्याची माहिती मलनिःस्सारण विभाग प्रमुखांनी दिली. पाणी साठण्यामागे सदरचे देखील महत्वाचे कारण होते. त्यामुळे मलनिःस्सारण केंद्र तातडीने महापालिकेच्या ताब्यात घेण्याविषयी ‘सिडको'बरोबर पत्रव्यवहार करण्याच्या सूचना आयुक्त चितळे यांनी संबंधित विभागाला दिल्या.

 तसेच कळंबोलीतील ३ मुख्य नाल्यांतून पाणी पुढे का गेले नाही, तिथे निर्माण झालेल्या अडचणी-त्यावरील उपाययोजना याबाबत आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला. सदर ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यावेळी पनवेल आणि नवीन पनवेलमध्ये पाणी साठण्याची कारणे यावर चर्चा करण्यात आली. पनवेल मधील कच्छी मोहल्ल्यामधील भारत नगरमध्ये आणि नवीन पनवेलमध्ये बांठिया शाळा, तक्का येथे मुसळधार पावसाने पाणी साठल्याचे दिसून आले. याठिकाणी पाणी साठू नये यावरील तोडगा काढण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, सदर बैठकीत अग्निशमन केंद्रांची सेवा वाढविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच ‘सिडको'कडील अग्निशमन केंद्र हस्तांतरण करण्याबाबत यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 पर्यावरणपुरक उत्सव साजरे करण्याचे आवाहन