उच्च विद्युत वाहिनीखाली ‘सिडको'तर्फे अनधिकृत पार्किंग

सीबीडी : सीबीडी येथील सिडको भवन आणि कोकण भवन परिसरात असलेल्या अनधिकृत वाहन पार्किंग विरोधात कारवाई करावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा ‘आम आदमी पार्टी'च्या वतीने देण्यात आला आहे.  

कोकण भवन आणि सिडको इमारतीच्या लगतच्या बाजुने टाटा कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. सदर विद्युत वाहिनी खाली ‘सिडको'ने वाहन पार्किंग व्यवस्था केली आहे. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या उजव्या आणि डाव्या बाजुला काही मीटर अंतरावर प्रतिबंध क्षेत्र असताना ‘सिडको'ने सदर विद्युत वाहिनीखाली वाहन पार्किंग करण्याची जागा निर्माण केली आहे. सदर बाब ‘सजग नागरिक मंच'च्या सदस्यांनी ‘आप'च्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ‘आप'तर्फे ‘सिडको'कडे माहिती अधिकारात विचारणा करण्यात आली.  

दरम्यान, ‘सिडको'ने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली वाहन पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यापूर्वी टाटा कंपनी, नवी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले आहे. सदर बाब सिडको व्यवस्थापनाने देखील माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात मान्य केली असल्याचे ‘आम आदमी पार्टी'चे म्हणणे आहे.  

उच्च विद्युत वाहिनीच्या खाली अनधिकृतरित्या वाहन पार्किंग करणे अत्यंत धोकादायक असून घाटकोपर सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करत ‘आप'ने सदर अनधिकृत वाहन पार्किंग विरोधात कारवाई करण्याची मागणी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सदर पार्किंग पूर्णतः अनधिकृत, बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीर पार्किंगच्या ठिकाणी जर घाटकोपर सारख्या अपघाताची पुनरावृत्ती झाली तर त्याची कायदेशीर जबाबदारी कोणाची? पेच निर्माण होऊ शकतो. सिडको सारख्या सरकारी महामंडळाकडून बेकायदेशीर पार्किंगची व्यवस्था उभारणे अत्यंत गंभीर प्रकार असून याबाबत ‘सिडको'कडून तातडीच्या कारवाईची अपेक्षा आहे.

-श्यामभाऊ कदम, राज्य सहसचिव-आप, महाराष्ट्र.

निवेदन प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत सदर बेकायदेशीर  पार्किंग व्यवस्थेवर कायदेशीर कारवाई केली नाही तर आम आदमी पक्ष या बेकायदेशीर पार्किंग विरोधात आंदोलन करेल.
-दिनेश ठाकूर, कार्यकारी अध्यक्ष-आप नवी मुंबई.

या बेकायदेशीर पार्किंग बाबत टीम आप नवी मुबई गेल्या २ वर्षांपासून ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक, पोलीस आयुक्त, नवी मुंबई महापालिका आयुक्त, अध्यक्ष-टाटा पॉवर आदि प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. पण, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.

-प्रीती शिंदेकर, उपाध्यक्ष-आप नवी मुंबई. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 आपत्ती व्यवस्थापन कार्याचा महापालिका आयुक्तांकडून आढावा