तरुण-तरुणींनो वेळेत स्वतःला सावरा !
किशोरवयात मुला-मुलींमध्ये शारीरिक बदल होतात. जसे की, मुलांना दाढी-मिशा येणे, आवाजात बदल होणे, मुलींना पाळी येणे. शरीरात इतर बदल होताना त्याही प्रथमतः घाबरुन जातात. वेळीच त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची नितांत गरज असते. अशावेळी मुले ज्येष्ठापासून दूर-दूर राहू लागतात, याच काळात समाजातील धुर्त मंडळी-समाज कंटक मंडळी अशा किशोरवयीन मुलांना, त्यांना त्या काळात हव्या वाटणाऱ्या गोष्टी पुरवून व्यसनात अडकवू शकतात. अशा वेळी पालकांनी परिवारातील सदस्यांनी पुढे येऊन या मुलामुलींना नीट समजावून सांगितले पाहिजे.
दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढे काय? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यासमोर राक्षसासारखा उभा असतो. प्रत्येक मुलगा आपल्या मित्राच्या कलानुसार विचार करताना दिसतो. पण त्यातही तो आपला निर्णय पवका घेऊ शकत नाही. कारण अनेक मुले विविध मार्ग सुचवत असतात. त्यातच आई-वडिलांची मर्जी वेगळीच असते. जी मुलांना बिलकुल पसंत पडत नाही. त्याउलट माता-पित्यांना आपल्या इच्छा, आकांक्षा मुलांकडून पूर्ण करुन घेण्याचा भाव असतो.
१० वी - १२ वीच्या मुलांचे साधारण वय १८ च्या खालचे असते. म्हणजेच ते ना तरुण ना लहान मुले, या साधारणपणे ‘किशोरवयीन' म्हटले जाते. या वयात त्यांना चांगल्या-वाईटाची पारख नसते, ना व्यवहाराचा लवलेश नसतो, मग भविष्यासाठीचा निर्णय ते स्वतः कसा घेऊ शकतात? काही मुले फार बदमाश असतात; ते स्वतःसाठी वेगळा निर्णय घेतात व भोळ्या भाबड्या मित्राच्या मनात नको ते विषय भरवून देतात. अशा परिस्थितीत किशोरवयीन मुले पार गोंधळून जातात.या काळात किशोर-किशोरींना स्वतःत अनेक शारीरिक आणि मानसिक बदल जाणवत असतात व त्याविषयी त्यांच्यात जिज्ञासा उत्पन्न होत असते. त्या जिज्ञासाची पूर्ती जास्त गरजेची असते. जर आपण त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले नाही तर ते गल्ली-बोळातील लोकांचा वा तथाकथीत टपोरी-मवाली, वा युवा नेत्यांचा आधार घेतात व अर्धवट ज्ञान मिळवून भरकटतात. आपले मुल भरकटू नये यासाठी आपण आपल्या किशोरवयीन मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी फार काही मोठे करावे लागत नाही, फवत त्यांना आवश्यक ते ज्ञान देऊन त्यांना मदत करावी.
बहुतेक आई-वडील मुलींकडे लक्ष देतात, पण मुलांकडे तेवढे लक्ष देत नाहीत, मुलांच्या बाबतीत ते बिनधास्त राहतात, परिणामस्वरुप मुले गैर मार्गावर जाण्याची शवयता वाढते. लहानपणापासूनच मुलांना किशोरावस्थेसाठी तयार करावे, त्यांना निसर्गाविषयी व त्यांच्या अवस्थांविषयी सांगावे. निसर्गावर प्रेम करायला शिकवावे. कारण याच अवस्थांतून किशोरवयीनांना जावे लागते, शरीरात नैसर्गिक बदल होतांना मुला-मुलींना वेगळ्याच मानसिकतेतून जावे लागते, त्यांना या अवस्थांना कसे सामोरे जायचे हेच कळत नाही, मुलींना तर त्यांच्या आया बरेच काही सांगुन जातात, पण मुलांना कोण समजावून सांगणार? हे काम बापानेच करायचे असते, ते करतांना त्याने मुलाला मित्रासारखे वागवणे गरजेचे असते, बरीच बाप मंडळी हे काम इमाने-इतबारे करत नाहीत. कारण या विषयी ते स्वतःच संभ्रमित असतात, मुलांना या विषयावर कसे वा कोणत्या भाषेत बोलू, असा त्यांच्यापुढे प्रश्न येतो. खरंतर निःसंकोचपणे मुलाला सर्व काही सांगुन मोकळे व्हावे, त्यात लपवण्यासारखे काय आहे. या सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत. त्या घडामोडी होतच राहणार, काही बाबतीत किशोरवयीन मुलं अनभिज्ञ असतात. त्यांच्या मनात अनेक बाबतीत जाणून घेण्याची इच्छा असते, पण त्यांची जिज्ञासा कोण उकलून सांगणार? त्यांच्या प्रश्नाची उत्तरे अर्धवट दिली किंवा उत्तरे देण्यास टाळाटाळ केली तर परिस्थिती बिघडू शकते.
खासकरुन मुलांमध्ये मुलींविषयीचे आकर्षण वाढते, ते तिच्याविषयी अधिक अग्रेसर बनण्याच्या प्रयत्नात असतात अशावेळी मुलांना गैरसमजातून बाहेर काढावे, त्यांना योग्य ज्ञान देऊन या समस्येतून बाहेर काढावे, म्हणूनच परदेशात मुलांना योग्य वेळी लैंगिक शिक्षण देऊन, त्यांना सावध केले जाते. परिणामस्वरुप मुलंमुली कसलाही भेदभाव न ठेवता स्वच्छंदपणे, वा मनमुराद निसर्गाचा आनंद लुटतात. आपल्या देशात मात्र किशोरवयीन मुलांना योग्य ज्ञान न दिल्याने त्यांच्यातील भावना उग्र होत जाते. परिणाम आपणा सर्वांनाच माहित आहेत. हे सर्व करत असताना मुलांना वयानुसार चांगल्या वाईट गोष्टीविषयी सांगत राहावे. त्यांना बऱ्या-वाईटाची ओळख किंवा पारख कशी करायची हे त्यांना समजेल अशा भाषेत सांगणे गरजेचे आहे. कुंभार जसा, मातीच्या गोळ्याला जसा आकार देतो तसा किशोर-किशोरींना, मानसिक व सामाजिक आकार देण्याचे काम काळाची गरज ठरु लागले आहे. सध्याच्या तरुणाईचा मानसिक विकास कसा होईल हे पाहणे माता-पित्याचे काम आहे.
अनेक मुलं आपल्या माता-पित्यांवर विश्वास ठेवत नाहीत, हा मुलांचा दोष नाही तर तो माता-पित्याचांच दोष असतो. कारण वेळो-वेळी आपणच आपल्या वागण्या-बोलण्यातील फरक मुलांना दाखवून दिलेला असतो. मग ते आपल्यावर कसा विश्वास ठेवणार? खरं तर मुलांचा-मुलींचा विश्वास आपल्या माता-पित्यावर लहानपणापासून असतो, पण ती विश्वासाची जागा अविश्वासात कधी बदलली हे समजूनच येत नाही. तो विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशावेळी मुला-मुलींना प्रासंगिक गोष्टींतून समाजविणे सोपे जाते.
सध्या मुलांची अशी भावना झाली आहे की, त्यांना वाटते, त्यांना कोणी समजूनच घेत नाही. खरं तर समजणे व समजून घेणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वयातील अंतराबरोबरच वैचारिक अंतर वाढलेले आहे. आजच्या तरुणांना वेळेच्या आधीच सर्व प्रकारच्या सोयी-सवलतीसह नवनवीन उपकरणांचा वापर करण्यास मिळू लागला आहे. विज्ञानाने नव नवीन दालने युवकासमोर आणली आहेत. त्यामुळे ‘घंटो का काम मिनटों में' चा हा जमाना असला तरी, काही बाबतीत किशोरवयीन मुलांना काही गोष्टी आवावयाबाहेरच्या वाटू लागतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काळजीची छटा दिसू लागते. म्हणतात ना ‘चेहरा मनाचा आरसा' असतो. मनात चाललेले विचार आपोआप चेहऱ्यावर येतात. विचारांचा प्रभाव आपल्यावर खूप पडतो. सकारात्मक विचार जीवनाला सोपे बनवितात. तर नकारात्मक विचार जीवनाला अवघड करुन टाकतात. आणि विशेष म्हणजे हे नकारात्मक विचार आपल्या जीवनात कोणत्याही वेळी प्रवेश करु शकतात. त्याची खरी सुरुवात किशोरवयातच होत असते.
किशोरवय हा असा कालावधी आहे. जेव्हा किशोरवयीनांना लहान मुलांमध्ये मोजले जात नाही आणि मोठ्यांमध्येही नाही म्हणजेच त्यांची स्थिती अशी असते - ‘घर का ना घाट का' तेव्हा त्यांना कसे वागावे हेच समजत नाही. आई-वडील त्यांना समजू शकत नाहीत, घरात भाऊ-बहीण त्यांच्या म्हणण्याला महत्त्व देत नाहीत. शाळेत शिक्षक त्यांना समजू शकत नाहीत. मित्रसुध्दा त्याच परिस्थितीतून जात असतात त्यामुळे त्यांचा सल्लाही घेतला जाऊ शकत नाही. अनेक लहानसहान गोष्टी त्रासदायक ठरतात. अशावेळी ही मुले नकारात्मक विचारांनी घेरले जातात.
शालेय जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात कॉलेज जीवनातही त्यांना वेगवेगळ्या समस्याचा सामना करावा लागतो. शालेय जीवनाच्या टप्प्यावर १०वीची बोर्ड परिक्षा तर बारावीनंतर कोणती शाखा निवडावी याचा ताण मुला-मुलींवर येतो. परिक्षा काळात आई-वडिल अभ्यासासाठी तगादा लावतात, तर मित्रमंडळी अभ्यासा व्यतिरिवतच्या इतर सवयीत गुंतवण्याचा प्रयत्न करतात. यांत श्रीमंत आई-बापाची मुलं सहजासहजी फसली जातात. त्यांना स्वतःच्या करिअरचे भान नसते; वडिलधाऱ्यांचा वा गरीब मित्रांचा अपमान करण्यात त्यांना थ्रील वाटते. ते आपल्या मस्तीत वावरतात. त्यांचे आई-वडील त्यांना भरमसाठ पैसा ओतून चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देतात. तेथेही त्यांचा जास्त कल, अभ्यासा व्यतिरिवतच्या इतर ‘ॲवटीव्हिटी' कडेच असतो. त्याचवेळी गरीब व होतकरु मुलांचा कल फवत आणि फवत अभ्यासाकडेच जास्त असतो. नव्हे तो त्यांना द्यावाच लागतो.
घरची हलाखीची परिस्थिती त्यांना वाटेल ते करण्याची परवानगी देत नाही. त्यांना माहित असते की, आपण अभ्यास नाही केला तर आपल्या नशीबी, काबाडकष्टच राहणार व कुढत जगावे लागणार! श्रीमंत मुलांचे काय, त्यांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा लाभल्याने, त्यांना कशाचीही ददात नसते. नोकरी नसली तरी, वडिलोपार्जित उद्योगधंदे, व्यापार त्यांच्या सेवेला हजर असतात. नोकर-चाकर त्यांच्या दिमतीला असतात. त्यांच्यात सेवा-भाव सहसा येत नाही. ते पैशावर पैसा कमावण्याच्या धुंदीत आपले संस्कार विसरुन जातात. खरं तर संस्कार म्हणजे काय हेच माहित नसते. मोठ्यांचा मान ठेवणे त्यांच्या संस्कारात येत नाही. त्यांना कोणाचे काही ऐकावे असे वाटत नाही, तर त्यांना स्वतःचेच वागणे, बोलणे, चालणे बरोबर वाटायला लागते. उलट त्यांचा असा समज होतो की, त्यांना कोणी समजूनच घेत नाही.
जेव्हा किशोरवयात त्यांच्यात शारीरिक बदल होतात, तेव्हा ते खुपच घाबरतात. जसे की, मुलांना दाढी-मिशा येणे, आवाजात बदल होणे, मुलींना पाळी येणे, वा शरीरात इतर बदल होतांना त्याही प्रथमतः घाबरुन जातात. वेळीच त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची नितांत गरज असते. अशावेळी मुले ज्येष्ठापासून दूर-दूर राहू लागतात, याच काळात समाजातील धुर्त मंडळी-समाज कंटक मंडळी अशा किशोरवयीन मुलांना, त्यांना त्या काळात हव्या वाटणाऱ्या गोष्टी पुरवतात. दारु-सिगारेटच्या व्यसनात अडकवतात. बऱ्याच वेळा याही पुढच्या व्यसनात अडकवतात. त्यात ते गुरफटून जातात. जेव्हा पैशाची चणचण भासू लागते तेव्हा ते पैशासाठी काहीही करायला तयार होतात व वाममार्गाला लागतात.
आता तर मोबाईलचा जमाना आहे. लहानापासून थोरांकडे हे ‘डबडं' असतं. त्याचे फायदे जेवढे आहेत, त्यापेक्षा त्याचे तोटेच जास्त आहेत. त्याने सर्वांनाच वेड लावले आहे. त्याच्या अतिवापराने काहींचे कान बधीर झाले आहेत. तर काहींचे होण्याच्या मार्गावर आहेत. या बाबतीतही किशोरवयीन ऐकायला तयार नाहीत. त्यांना कोणी समजावले तरी त्यांना ते मान्य नाही. शेवटी परिणाम जे होणार, त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागणार हे सत्य नाकारुन चालणार नाही. - भिमराव गांधले