मजुरांची वानवा; शेतकऱ्यांचा यांत्रिक पध्दतीने भात लागवडीकडे वाढता कल

खारघर : भातशेतीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत असून, शेती परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे शेतकरी यंत्राच्या सहाय्याने भात लावणीकडे वळू लागला आहे. तळोजा मजकूर येथील वैभव पाटील या शेतकऱ्याने टोचन यंत्रनेच्या मदतीने भात लागवड करुन तळोजा परिसरातील  शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पनवेल तालुक्यात भातशेतीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. यामुळे शेती परवडत नाही. भातशेतीसाठी बाहेरील गावातून  मजूर आणून भात लागवड करणे, त्यासाठी वाहन भाडे, दिवसाची मजुरी आणि मजुरांचा थकवा दूर करण्यासाठी संध्याकाळी वेगळे खर्च करावा लागतो. त्यात बी बियाणे आणि रासायनिक खताच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी बहुतांश शेतकरी उन्हाळ्यात ट्रॅक्टरने शेतीची मशागत करुन पावसाळ्यात टोचण पध्दतीने भात लागवड करत असल्याचे चित्र दिसत आहे.

पारंपारिक पध्दतीने भात पीक लागवडीसाठी मजूर बाहेर गावातून आणावे लागत आहेत. मजुरी, वाहन भाडे आणि इतरही खर्च करावा लागत आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी यावर्षी टोचण यंत्रद्वारे भात लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या यांत्रिक पध्दतीने भात लागवड केली आहे. तळोजा परिसरात टोचण यंत्रद्वारे भात लागवड करण्याचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे शेतकरी कौतुक करीत आहेत.  - वैभव पाटील, शेतकरी - तळोजा मजकूर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महाकवी कालिदास दिन कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद