‘टॉमेटो' दराची पुन्हा उसळी

वाशी : मागील तीन आठवडे दरवाढ होऊन ३०-४५ रुपयांवर स्थिर झालेल्या टोमॅटो दराने ६ जुलै पासून पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात टोमॅटो दर आता प्रतिकिलो ४०-६० रुपयांवर गेला असून, किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला जात आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील टोमॅटो उच्चांकी दर गाठणार का?, याची चिंता सर्वसामान्य गृहिणींना पडली आहे.

पावसामुळे टोमॅटो उत्पादन खराब होत असल्याने शेतातून टोमॅटो उत्पादन घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे बाजारात सध्या टोमॅटो आवक घटली आहे. महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि संगमनेर तर बंगळूरु मधून टोमॅटो दाखल होतो. परंतु, वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला बाजारात राज्यातील टोमॅटो दाखल होत असताना बंगळूरुमधून होणारी टोमॅटो आवक पूर्णतः बंद आहे. एपीएमसी भाजीपाला बाजारात आधी  ४० ते ५० गाड्या असलेली टोमॅटो आवक आता कमी झाली असून, २० ते ३० गाड्यांमधून १७३३ क्विंटल टोमॅटो आवक होत आहे. एपीएमसी भाजीपाला बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहेत.  परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे टोमॅटो दरवाढ झालेली आहे. घाऊक बाजारातच ४०-६० रुपये प्रतिकिलो या दराने टोमॅटो विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात ८०-१०० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विक्री होत आहे.

दरम्यान,  एपीएमसी भाजीपाला बाजारातच टोमॅटो आवक कमी राहिली तर यापुढे काही दिवस टोमॅटो दर असेच चढेच राहतील, अशी माहिती भाजीपाला व्यापारी तानाजी चव्हाण यांनी दिली.

मागील वर्षी किरकोळ बाजारात टोमॅटो दर प्रतिकिलो १८० ते २०० रुपयांवर गेले होते. तर आता देखील दरात वाढ होऊन टोमॅटो दर प्रतिकिलो ८० ते१०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे एकीकडे कांदा, बटाटा, लसूण यांचे दर वाढलेले असताना आता टोमॅटो दर देखील वाढत चालले आहेत. त्यामुळे जेवण बनवताना खर्चाचा ताळमेळ साधताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. - शर्मिला पाटील, गृहिणी - घणसोली, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 हेल्मेट न घालणाऱ्या १०० चालकांवर कारवाई