म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
७ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन!
ठाणे : मुंब्रा मधील खडीमशिन रोड, दर्ग्याच्या वरील डोंगरामध्ये सुमारे ३०० फुट उंचीवर ५ शाळकरी मुले गेली असता त्यांना परतीचा मार्ग न मिळाल्याने ते तेथेच अडकल्याची घटना ५ जुलै रोजी रात्री समोर आली. यानंतर बचावकार्य हाती घेऊन घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी रात्रीच्या अंधारात तब्बल ७ तास मदत कार्य राबवून पाचही मुलांची सुखरुप सुटका केली.
मुंब्रातील खडीमशिन रोड, दर्ग्याच्यावर ५ जुलै रोजी सायंकाळी डोंगरावर ५ शाळकरी मुले फिरायला गेली होती. परतीचा मार्ग न मिळाल्याने सदर मुले ३०० फुट उंचीवर अडकली होती. सदर घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु करण्यात आले. मात्र, डोंगरामध्ये बरसणारा पाऊस, दाट अंधार, घसरण या सर्व कठीण परिस्थितीत मदतकार्य राबवणे कठीण जात होते. तरीही ७ तास अविरत मदतकार्य राबवून अखेर डोंगरावर अडकलेला मुलांची ६ जुलै रोजी पहाटे ३ वाजता सुखरुप सुटका करण्यात आली. असहदुल पिंटू शेख (१२, दर्गा गल्ली, मुंब्रा), मोहम्मद पिंटू शेख (११, दर्गा गल्ली, मुंब्रा), ईशान पिंटू शेख (१०, आझाद नगर, मुंब्रा), मुन्ना अमन शेख (९, दर्गा गल्ली, मुंब्रा), अमीर बाबू शेख (११, कौसा पेट्रोल पंप) अशी सदर शाळकरी मुलांची नावे आहेत. या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.