आषाढी एकादशीनंतर टाळ-मृदुंगासह रस्त्यावर उतरणार; २७ गांव ग्रामस्थांचा इशारा

डोंबिवली : २७ गावातील गावकऱ्यांनी गरजेपोटी बांधलेली बांधकामे सरसकट दस्त नोंदणी करणे, डोंबिवली एमआयडीसी  मध्ये झालेल्या स्फोटातील आगीमध्ये होरळलेल्या नागरिकांना नुकसानीची भरपाई ताबडतोब देणे, ‘कल्याण-तळोजा मेट्रो-१२'च्या प्रकल्पात स्थानिकांना न्याय देणे अशा मागण्यांसाठी ‘सर्वपक्षीय युवा संघटना'तर्फे बेमुदत साखळी उपोषण सुुरु केले होते. यादरम्यान ५ जुलै रोजी सायंकाळी ६ नंतर महपालिका प्रशासन आणि पोलिसांनी उपोषणकर्त्यांच्या मंडपावर कारवाई करत नोटीसा पाठविल्या आहेत. त्यामुळे उपोषणकर्ते ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आम्ही मागे हटणार नाही, आमच्या मागण्यासाठी आवाज उठविणारच, सरकारने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आषाढी एकादशीनंतर भूमीपुत्र टाळ-मृदुंग हाती घेऊन रस्त्यावर उतरतील, असा इशारा ‘सर्वपक्षीय युवा मोर्चा'चे पदाधिकारी माजी नगरसेवक संतोष केणे यांनी ६ जुलै रोजी पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात घेतलेल्या ‘पत्रकार परिषद'द्वारे दिला आहे.

याप्रसंगी ‘सर्वपक्षीय युवा मोर्चा'चे अध्यक्ष गजानन पाटील, माजी नगरसेवक संतोष केणे, मुकेश पाटील, रतन चांगो पाटील, काळू कोमास्कर, बाळाराम ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने भूमीपुत्र उपस्थित होते.

२७ गावांची वेगळी नगरपालिका झाली पाहिजे या मुख्य मागणीसाठी ‘सर्वपक्षीय युवा मोर्चा'चे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भूमीपुत्रांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले. आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाची परवानगी घेतली नाही म्हणून त्यावर कारवाई करीत तेथील मंडप उखडून टाकण्यात आला. पोलिसांकडून दडपशाही सुरु आहे. आमचे आंदोलन चिरडून टाकू नका, भूमीपुत्रांच्या सन्मानाला जागे करु नका, परिणाम वाईट होईल. पूर्वी आम्हाला ब्रिटीश संबोधले जायचे, त्यापध्दतीची कृती करण्यास भाग पाडू नका, असा इशारा बेमुदत उपोषण थांबविलेल्या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

२७ गावांमधील अति महत्त्वाचे प्रलंबित विषय मार्गी लागले जावेत. तसेच राज्य शासनाचे लक्ष याकडे केंद्रीत व्हावे यासाठी डोंबिवली पूर्व मधील मौजे सोनारपाडाजवळील साईबाबा मंदिरजवळ भूमीपुत्र बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसले होते. मात्र, ५ जुलै रोजी महापालिकेने मंडपावर कारवाई केली. आमचे आंदोलन थांबणार नाही तर ते अधिक मोठे असेल, असे गजानन पाटील यांनी सांगितले.

 २७  गावाची स्वतंत्र नगरपालिका आणि अमुदान केमिकल कंपनीतील स्फोटातील मुत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये, मेट्रो संदर्भात कारशेड माणगांव आणि सोनारपाडा येथे होत आहे. त्यावरील घरे पोलिसांनी आणि ‘एमएमआरडीए'ने भर पावसात जेसीबी लाऊन तोडली. जनतेचे सरकार म्हणणाऱ्या या लोकांनी ‘माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली आणि दुसरीकडे कारवाईत ४० दिवसाची मुलगी हातात घेतलेल्या आईला बेघर केले. सदर अत्यंत वाईट गोष्ट आहे. तहसीलदारांन विनंती करुनही त्यांनी कारवाई केली. वास्तविक भूमीपुत्रांना विश्वासात न घेता आणि पूर्व सूचना न देता भूसंपादन केले. स्वातंत्र्य काळापासून शेतकऱ्यांकडे या जमिनी आहेत, त्यावर त्यांचा अधिकार असून ताबा त्यांचा आहे. कारवाई करताना सरकारने शेतकऱ्यांचे हित पाहिले नाही. आम्ही यावर आवाज उठविल्यावर विधानसभेत आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी आवाज उठविला. आमच्या मागण्यांसाठी उपोषण केले. मात्र, त्यावर कारवाई झाली. आता जेल भरो आंदोलन करु. - संतोष केणे, माजी नगरसेवक. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 उच्च विद्युत वाहिनीखाली ‘सिडको'तर्फे अनधिकृत पार्किंग