ठाणे जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा पुरवठा
ठाणे : ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाखाली सर्व साधारण क्षेत्र ६०,००० हेक्टर एवढे असून, त्यापैकी भात पिकाखालील क्षेत्र ५३, ९२३ हेक्टर इतके आहे. याशिवाय नाचणी पिकाखालील क्षेत्र २४०६ हेक्टर, वरी पिकाखालील क्षेत्र १००५ हेक्टर, कडधान्य पिकाखालील क्षेत्र ९५५ हेक्टर, गळीत धान्य पिकाखालील क्षेत्र ४७२ हेक्टर आणि भाजीपाला पिकाखालील क्षेत्र ७१५ हेक्टर इतके आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यासाठी ११,११० मे. टन रासायनिक खतांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. शासनाकडून १०,००० मे. टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीस १४५० मे.टन रासायनिक खतांचा साठा कृषि सेवा केंद्रांकडे उपलब्ध होता. ५ जुलै अखेर ठाणे जिल्ह्यात ६४२८.२२ मे.टन रासायनिक खतांचा पुरवठा झालेला आहे. त्यामध्ये युरीया- ५८९३.२२ मे.टन, डीएपी- ५३ मे.टन, पोटॅश खते २४ मे. टन, सुफर फॉस्फेट १८ मे.टन, संयुक्त आणि मिश्र खते ४४० मे. टन असा पुरवठा आहे. ठाणे जिल्ह्यात खतांची कोणत्याही प्रकारची टंचाई नाही, असा दावा रामेश्वर पाचे यांनी केला.
रासायनिक खतांची विक्री पॉस मशीनद्वारे करण्यात येत असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच खतांची विक्री करण्यात येत आहे. याशिवाय हंगामात खतांची टंचाई जाणवू नये यासाठी ९१० मे.टन युरीया आणि २० मे. टन डीएपी खतांचा संरक्षित साठा (Buffer Stock) करण्यात आला आहे. आतापर्यंत ५,५७३ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाच्या रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत, असे रामेश्वर पाचे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात रासायनिक खत पुरवठा संबधातील नियोजन सुरळीत सुरु आहे. रासायनिक खतांच्या बाबतीत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.