वापरलेल्या टाकाऊ कपड्यांवर पुनर्प्रक्रिया

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या ‘वस्त्र मंत्रालय'मार्फत ग्राहक वापरानंतरचे कपडे पुनर्प्रक्रियेचा प्रायोगिक प्रकल्प नवी मुंबई महापालिका तर्फे राबविण्यात येत आहे. याविषयी जनजागृती करण्याकरिता नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सोसायटी पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयात संपन्न झाली.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दैनंदिन कचऱ्याचे ओला, सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे वर्गीकरण केले जात असताना त्यामधून टाकाऊ कपड्यांचेही स्वतंत्र वर्गीकरण करण्यात येऊन ते कपडे पुनर्वापरात आणण्याबाबतचा सदर अभिनव प्रकल्प प्रायोगिक स्वरुपात राबविण्यासाठी नवी मुंबई शहराची निवड करण्यात आली आहे. याबद्दल ‘केंद्रिय वस्त्र मंत्रालय'चे आभार मानत महापालिका अतिरिवत आयुवत सुनिल पवार यांनी जागरुक नवी मुंबईकर नागरिक यात सक्रिय सहभागी घेऊन सदर उपक्रम यशस्वी करतील, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ‘केंद्रिय वस्त्र मंत्रालय'चे संचालक तपनकुमार राऊत यांनी नवी मुंबई शहर स्वच्छतेविषयी अतिशय जागरुकतेने काम करीत असून नाविन्यपूर्ण स्वच्छता उपक्रम राबविण्यात नेहमीच आघाडीवर असते. त्यामुळे सदर अभिनव उपक्रम राबविण्यासाठी नवी मुंबईची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये केंद्रीय वस्त्र समिती, नवी मुंबई महापालिका तसेच स्वयंसेवी संस्था यांचा एकत्रित सहयोग असणार असून सोसायटी पातळीवर कपडे संकलन कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

याबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून नागरिकांकडून वापरात नसलेले टाकून दिले जाणारे कपडे म्हणजे कचरा नाही, त्याचा पुनर्वापर होऊ शकतो, त्यावर पुर्नप्रक्रिया करता येऊ शकते. सदर बाब लक्षात घेत कपडे पुनर्प्रक्रियेचा प्रकल्प राबविला जाणार असून या प्रक्रियेत स्वयंसहाय्यता बचत गटांनाही काम मिळेल आणि महिलांचे सक्षमीकरण होईल, असा विश्वासही तपनकुमार राऊत यांनी व्यक्त केला.

यावेळी ‘केंद्रीय वस्त्र मंत्रालय'चे अधिकारी प्रकाश सेन यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची कार्यवाही विशद केली. या दोन्ही केंद्रीय अधिकाऱ्यांचे महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांनी स्वागत केले.

सध्याच्या फॅशन ट्रेंड बदलाच्या प्रचंड गतिमान युगात फॅशन सायकल आता केवळ १५ दिवसांवर आली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कचरा म्हणून टाकल्या जाणाऱ्या कपड्यांंचा गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे. यावर सकारात्मक उत्तर शोधण्याच्या दृष्टीने कपडे पुनर्प्रक्रिया प्रकल्प राबविला जात आहे. याकरिता सोसायट्याांना भेटी देऊन तेथील नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसहभागाशिवाय उपक्रम यशस्वी होणे शक्य नाही, याकरिता सोसायटी पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद करण्यात येत आहे. नवी मुंबईकर नागरिक यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन कपडे पुनर्प्रक्रियेचा उपक्रम यशस्वी करतील. याद्वारे नवी मुंबई महापालिकाचे मॉडेल म्हणून कपडे पुनर्प्रक्रिया उपक्रम ओळखला जाईल, अशी खात्री आहे. -तपनकुमार राऊत, संचालक-केंद्रिय वस्त्र मंत्रालय

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा पुरवठा