म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
‘स्वच्छता दिंडी'द्वारे स्वच्छता-पर्यावरणाचा संदेश प्रसारित
नवी मुंबई : ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या नामगजरात बेलापूर विभागामध्ये करावे येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी होत स्वच्छता आणि पर्यावरणाचा संदेश प्रसारित केला. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' अंतर्गत विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये विविध वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
येत्या १७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून श्री वि्ील भेटीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी दिंड्या-पताका नाचवत ‘पंढरपूर'च्या दिशेने निघालेले आहेत. अशा वारीमय वातावरणात विद्यार्थ्यांना वारीची परंपरा प्रत्यक्ष अनुभवता यावी आणि या माध्यमातून संत सज्जनांनी सांगितलेला स्वच्छता-पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रसारित व्हावा यादृष्टीने ‘स्वच्छता दिंडी' असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये ५०० हून अधिक शालेय विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा करुन उत्साहाने सहभागी झाले होते. यात वि्ील आणि रखुमाईच्या वेशभूषेतील विद्यार्थी, संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम अशा संतांच्या वेशातील विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ तसेच मावळ्यांच्या वेशातील विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण होते.
दिंडीत सहभागी विद्यार्थी समुहांनी विविध जनजागृतीपर संदेश त्याविषयीचे फलक प्रदर्शित करीत आणि घोषणा देत प्रसारित केले. काही विद्यार्थी समुहांनी ‘ओलू-सुकू आणि घातकू'चे फलक उंचावत कचरा वर्गीकरणाचा स्वच्छता संदेश प्रसारित केला. सध्या ‘सफाई हटाओ-बिमारी भगाओ' अभियान राष्ट्रीय स्तरावर राबविले जात असून सदर ‘स्वच्छता दिंडी'मध्ये आरोग्य रक्षणाचाही संदेश विद्यार्थ्यांनी फलक उंचावून आणि घोषणा देत नागरिकांपर्यंत पोहोचवला. काही विद्यार्थ्यांनी ‘वृक्ष लावा-वृक्ष जगवा' असा संदेश वृक्षरोपे हातात घेऊन प्रसारित केला. वाचनाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या पुस्तके हातात घेऊन फलकांद्वारे वाचनजागृती करणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. त्याचप्रमाणे संतांची छायाचित्रे असणारे फलक प्रदर्शित करीत महाराष्ट्राच्या संत परंपरेचाही दिंडीत जागर करण्यात आला. दिंडीत सहभागी ओलू, सुकू आणि घातकू या मॅस्कॉटस्ची उपस्थितीही लक्षवेधी होती.
करावे गांव येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या पटांगणापासून सुरु झालेली स्वच्छता दिंडी ढोल-ताशे आणि बॅन्डच्या गजरात सीवुडस् मॉलच्या दिशेने विविध घोषणा देत निघाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी सदर उपक्रमाचे कौतुक करीत होते. सुरुवातीला करावे येथे परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या शुभहस्ते ‘स्वच्छता दिंडी'तील पालखीचे पुजन करण्यात आले. याठिकाणी सामुहिक स्वच्छता शपथ ग्रहण करण्यात आली. तेथून पायी निघालेल्या ‘स्वच्छता दिंडी'ची सांगता सीवुडस् मॉलच्या समोरील मोठ्या पॅसेजमध्ये करण्यात आली. येथे ज्याप्रमाणे वारीमध्ये पारंपारिक रिंगण घातले जाते, संतांचे अभंग गायले जातात, दिंड्या-पताका नाचविल्या जातात, फुगडी आणि इतर खेळ खेळले जातात, अशा कार्यक्रमांद्वारे ‘माझी वसुंधरा अभियान'ची शपथ घेऊन ‘स्वच्छता दिंडी'चा समारोप करण्यात आला.
‘स्वच्छता दिंडी'प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, उपायुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे तसेच ‘ज्ञानदीप सेवा मंडळ शाळा'चे अध्यक्ष, इतर पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.