पनवेल महापालिका, विसपुते कॉलेज यांचा जैवविविधता संवर्धनपर उपक्रम

पनवेल : पनवेल महापालिका आणिश्री. बापूसाहेब विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून जैवविविधता संवर्धनपर उपक्रमांतर्गत चिमणी संवर्धनासाठी व याच्या जनजागृतीसाठी रविवार दिनांक ३० जून रोजी एक घोंसला चिडियों के लिए या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत चिमण्यांना कृत्रिम निवारा आणि अन्न उपलब्ध करुन देण्यात येणारे फिडर महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांना टांगण्यात आले.

यावेळी ‘आदर्श शैक्षणिक समूह'चे अध्यक्ष धनराज विसपुते, संचालिका संगीता विसपुते, पनवेल महापालिका पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, आदिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्या आणि इतर पक्ष्यांची संख्या घटणे चिंताजनक विषय आहे. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सुचनेनुसार माझी वसुंधरा ५.० अंतर्गत श्री. बापूसाहेब विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक घोंसला चिडियों के लिए या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रमांतर्गत चिमण्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करण्यात आली. चिमण्यांना कृत्रिम निवारा आणि अन्न उपलब्ध करुन देण्यात येणारे फिडर महाविद्यालय परिसरात असलेल्या प्रत्येक झाडावर (चिमण्यांसाठी घरटे) टांगण्यात आले.

विसपुते कॉलेज आणि पनवेल महापालिका यांच्यात नुकताच पर्यावरण जनजागृती-संवर्धन विषयी सामंजस्य करार करण्यात आला आहे . या अंतर्गत महापालिका आणि विसपुते महाविद्यालय यांच्या वतीने विविध पर्यावरणपूरक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या प्राचार्य  डॉ. सीमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, भविष्यातही अशा प्रकारचे विविध उपक्रम या अंतर्गत राबविण्यात येणार आहेत. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘जिल्हा परिषद'च्या ८ शाळा नादुरुस्त; ९ शाळांमधील १८ वर्गखोल्या धोकादायक