७ जुलै रोजी पोलीस भरती लेखी परीक्षा

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई भरतीच्या मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या ७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी सकाळी ७ वाजता हजर रहावे लागणार आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या १८५ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीसाठी ५,९८४ उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील मैदानी चाचणीत १,३९९ पुरुष, ४४३ महिला आणि ७१ माजी सैनिक असे एकूण १,८४२ उमेदवार पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या ७ जुलै रोजी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये सकाळी ९ वाजता घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना आपल्या सोबत स्वतःचे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड), आधारकार्ड, पॅनकार्ड आणि स्वतःचे पासपोर्ट साईजचे २ फोटो घेऊन येण्यास सूचित करण्यात आले आहे. अन्यथा लेखी परीक्षेला प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

मैदानी चाचणी दरम्यान घेण्यात आलेले उमेदवारांचे बायोमेट्रिक ठसे जुळल्यानंतरच त्यांना लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवारांकडून लेखी परीक्षादरम्यान कोणत्याही छुप्या गॅझेटचा (उदा. मोबाईल, ब्ल्युटुथ, मायक्रोचिप, आदि) वापर होऊ नये यासाठी डीएफएमडी आणि एचएचएमडी यंत्रणाद्वारे उमेदवारांची फ्रिस्किंग करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा ओएमआर तंत्रज्ञानावार आधारित घेण्यात येणार असून या लेखी परीक्षावेळी उमेदवारांकडून कोणत्याही गैरप्रकारांचा अवलंब होऊ नये यासाठी पीटीझेड सुविधा असणारी सीसीटीव्ही यंत्रणा देखील परीक्षा केंद्राच्या आत आणि बाहेर कार्यान्वित करण्यात आली आहे.  

पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक, तटस्थपणे, निःपक्षपातीपणे होणार असून उमेदवाराने कोणत्याही भुलथापांना अथवा आमिषास बळी पडू नये. तसला काही प्रकार आढळून आल्यास उमेदवारांनी त्याची माहिती नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

-संजयकुमार पाटील, पोलीस उपायुवत-मुख्यालय, नवी मुंबई.  

उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल, बॅग, पिशवी, डिजीटल घड्याळ, कॅल्क्युलेटर, ब्ल्युटुथ, हेडफोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पुस्तके, आदि वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता वैद्यकीय सेवा, फिरते शौचालय, पाणी, खाद्यगृहाचे स्टॉल आदि व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दूर अंतरावरुन येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचता यावे याकरिता पनवेल, मानसरोवर तसेच वाशी रेल्वे स्टेशन वरुन परीक्षा केंद्रापर्यंत येण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवीन ठाणे रेल्वे स्टेशन संदर्भात खासदारांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा