छत कोसळण्याच्या भयाखाली व्यापार

वाशी मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील सर्व इमारतींसह मॅफको मार्केट इमारत धोकादायक स्थितीत असून, या सर्व इमारतींचे संरचना परीक्षण करुन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिकेने एपीएमसी प्रशासनाला दिल्याने एकूणच एपीएमसी आवारातील इमारतींचे धोकादायक वास्तव समोर आले आहे.एपीएमसी'च्या पाचही आवारातील सर्व इमारतींसह मॅफको मार्केट इमारत महापालिका प्रशासनाने धोकादायक घोषित केल्याने या इमारतींमधील गाळेधारकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने यंदा देखील स्वतःचा जीव मुठीत धरुन व्यवसाय करावा लागणार आहे.मुंबई मधील मस्जिद बंदर येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन शेतकरी आणि व्यापारी यांच्या सोयीसाठी १९८२ साली मुंबई शहरातील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती वाशी-तुर्भे येथील ‘सिडको'च्या १७५ एकर जागेत वसवण्यात आली. त्यानंतर अल्पावधितच  वाशी मधील ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'ची आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ अशी ओळख निर्माण झाली. मात्र, येथील इमारतींचे बांधकाम निकृष्ट केल्याने अवघ्या २० वर्षातच या इमारती जीर्ण होऊन काही ठिकाणी छताचा भाग कोसळून धक्के तुटले तर धक्यांवरील भागातील प्लॅस्टर कोसळू लागले. इमारतीला खांबाना तडे जाण्यास सुरुवात झाली.त्यामुळे महापालिकेने सर्वप्रथम २००५ मध्ये एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील इमारती धोकादायक असल्याचे घोषित केले होते. तर आता संपूर्ण एपीएमसी कांदा-बटाटा,फळ ,भाजी,धान्य आणि मसाला मार्केट मधील सर्व इमारती तसेच मसाला मार्केट मधील मध्यवर्ती सुविधा इमारत आणि मॅफको मार्केट इमारत देखील धोकादायक घोषित करण्यात आली आहे. तसेच या इमारती पडून काही दुर्घटना घडल्यास त्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, अशी तंबीही नवी मुंबई महापालिका तर्फे देण्यात आल्याने, व्यापार करायचा कोठे?, असा प्रश्न धोकादायक इमारतीतील व्यापाऱ्यांना सतावणे साहजिकच आहे. मागील अनेक वर्षापासून महापालिका मार्फत एपीएमसी आवारातील इमारती धोकादायक असल्याचे घोषित करुन देखील एपीएमसी प्रशासनाने व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन न दिल्याने धोकादायक इमारतीतील व्यापाऱ्यांना स्वतःचा जीव मुठीत धरुन व्यवसाय करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नवी मुंबई शहरातील ३० वर्ष जुन्या इमारतींचे तज्ञ वास्तू विशारदांकडून तसेच नामांकित परीक्षण संस्थांकडून संरचना परीक्षण करुन त्या बाबतचा अहवाल नवी मुंबई महापालिकेकडे सादर करण्याचे तसेच अहवालात दुरुस्ती अथवा पाडकाम बाबत दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. या आदेशानुसार एपीएमसी प्रशासनाने  एपीएमसी आवारातील इमारतींचे संरचना परीक्षण केलेले अहवाल न दिल्याचे महापालिका प्रशासनाद्वारे सांगण्यात येत असल्याने एपीएमसी प्रशासन व्यापाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे का?, असा प्रश्न एपीएमसी आवारातील धोकादायक इमारतीतील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

रस्त्यावरील विक्रेत्यांबाबतच्या कायद्याकडे दुर्लक्ष