महापालिका आयुवतांची नमुंमपा शाळेत सरप्राईज व्हिजीट

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आरोग्य आणि शिक्षण या विषयांना सर्वाधिक प्राधान्य राहिले असून महापालिका शाळांतील शिक्षणाचा दर्जा गुणवत्तापूर्ण राहील आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणा-या सुविधांचा दर्जा उत्तम असेल, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष आहे.

या अनुषंगाने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ४ जुलै रोजी वाशी, सेक्टर-१६ येथील नमुंमपा शाळा क्र.२८ मध्ये अचानक भेट देत तेथील कामकाजाची आणि सेवांची बारकाईने पाहणी केली. यावेळी आयुवतांनी शाळा व्यवस्थापनामध्ये आमुलग्र सुधारणा करण्याचे निर्देश दिले. शाळेतील अंतर्गत स्वच्छतेवर नाराजी व्यक्त करीत शाळेपासूनच विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार होत असल्याने शाळेची अंतर्गत स्वच्छता आणि परिसर स्वच्छ असणे शिक्षकांची जबाबदारी असल्याचे सांगत यामध्ये त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश आयुवत डॉ. शिंदे यांनी दिले. पाहणीमध्ये काही वर्गांमध्ये तसेच गच्चीवर टाकाऊ सामान तसेच बेंचेस कसेही टाकून ठेवण्याचे निदर्शनास आले. त्यांची विल्हेवाट लावून अथवा योग्य प्रकारे व्यवस्थित ठेवून नीटनेटकेपणा राहील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

आयुक्तांनी भेट दिलेली सकाळची वेळ विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची असल्याने मुलांना देण्यात येणारे अन्न डॉ. कैलास शिंदे यांनी स्वतः खाऊन पाहिले. यावेळी अन्नाच्या दर्जात अधिक सुधारणा करण्याचे आणि त्याकडे दैनंदिन लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले. अन्न तपासणाऱ्या शिक्षकांच्या नावासह अन्नाच्या दर्जाबाबतची नोंद आहार पुरवठा नोंदवहीत दररोज न चुकता करावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात अन्न उपलब्ध होईल याची काळजी घेतानाच त्यांना ते खाण्यासाठी स्वच्छ आणि योग्य जागा उपलब्ध करुन द्यावी. विद्यार्थ्यांना भोजन, खाऊ खाण्यासाठी स्वच्छ ताटे पुरविण्यात यावीत. भोजन झाल्यानंतर उरलेले अन्न पुरवठादाराने त्याच दिवशी परत घेऊन जाणे गरजेचे असून अन्न वितरणाची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांनी याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुवत डॉ. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हजेरीपटाचीही आयुक्तांनी बारकाईने पाहणी केली. केंद्र समन्वयक यांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील शाळांच्या व्यवस्थापनावर आणि तेथील शैक्षणिक गुणवत्तेवर अधिक बारकाईने लक्ष ठेवाव. तर शिक्षण अधिकारी यांनीही शाळांना भेटी देऊन तेथील व्यवस्थापनाच्या सुनियोजितपणावर नियमीत लक्ष ठेवावे, असे आयुक्त डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 आषाढी एकादशी निमित्त खारघर मध्ये जगन्नाथ रथयात्रा