एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील बंद वजन काट्याचा व्यापाऱ्यांना फटका

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात दाखल झालेला बटाटा सडत असून, तो कचऱ्यात फेकण्याची नामुष्की व्यापाऱ्यांवर ओढवली आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात उत्तरप्रदेश मधून बटाटा दाखल होत असून, एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील वजन काटा बंद असल्याने बाजारात वेळेवर बटाटा गाडी विक्रीसाठी दाखल होत नाही. त्यामुळे बटाटा आणखी खराब होत असून सडत आहे.  १ जुलै पासून एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात आलेला तब्बल ३०० टन पेक्षा अधिक बटाटा सडला असून, तो कचराभूमीवर फेकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात दररोज बटाट्याच्या ३० ते ४० गाड्या दाखल होत आहेत. परराज्यातील उत्तर प्रदेशातून बटाटा दाखल होत आहे. परंतु, पावसामुळे जागेवरुन ओला बटाटा भरला जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणाहून एपीएमसी बाजारात बटाटा येण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी जात आहे. त्यातच एपीएमसी बाजारातील वजन काटा गेल्या १५-२० दिवसांपासून बंद असल्याने बाहेर वजन करुन बाजारात गाडी विक्रीसाठी दाखल होण्यासाठी उशीर होत आहे. परिणामी बटाट्याच्या विक्रीला विलंब होत असल्याने बटाटा मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. १ जुलै पासून बटाटा खराब होण्याची परिस्थिती अधिक बिकट होत असून, सडलेल्या बटाट्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे सडलेला ३०० ते ३५० टन बटाटा तुर्भे येथील कचराभूमीवर फेकण्यात आला आहे.

पुरवठा कमी; बटाटा दरात वाढ

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात उत्तर प्रदेशमधून बटाटा दाखल होत असून, त्या ठिकाणाहून ओला बटाटा गाडीमध्ये भरला जात आहे. उत्तर प्रदेश मधून एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात बटाटा दाखल होण्यासाठी २ ते ३ दिवस जात आहेत. तर दुसरीकडे एपीएमसी मार्केट मधील वजन काटा बंद असल्याने वजन काटा अभावी विक्रीसाठी बटाटा दाखल होण्यास उशीर होत आहे.  या दोन्ही कारणांमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर बटाटा सडत असून, तो कचऱ्यात फेकावा लागत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात अवघा २० ते ३० टक्के उत्तम दर्जाचा बटाटा उपलब्ध आहे. परिणामी बाजारात चांगल्या बटाट्याला जास्त मागणी असल्याने बटाटा दर वधारले आहेत. आधी प्रतिकिलो २२ ते २५ रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा आता २६ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विद्यार्थी बनले शेतकरी