‘शिवसेना'चा नवी मुंबईतील विधानसभेच्या एका जागेवर दावा

नवी मुंबई : राज्यात ‘महायुती'मधील मित्र पक्ष वाढत आहे. त्यामुळे आपलाही शिवसेना पक्ष नवी मुंबईत वाढावा म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईतील दोन पैकी एक मतदार संघ ‘शिवसेना'ला सोडवावा, अशी मागणी ‘शिवसेना'चे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी केली आहे.

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच ‘शिवसेना-भाजपा महायुती सरकार'ने गेल्या २ वर्षाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय यांची माहिती देण्यासाठी ‘नवी मुंबई शिवसेना'च्या वतीने ३ जुलै रोजी ‘पत्रकार परिषद'चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘शिवसेना' उपनेते विजय नाहटा, ‘महिला आघाडी'च्या जिल्हा संघटक सरोज पाटील, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, संघटिका दमयंती आचरे, माजी नगरसेवक ममित चौगुले, रामाशेठ वाघमारे, राजू पाटील, रामआशिष यादव, आदि उपस्थित होते.

२३ जून २०२२ रोजी राज्यात ‘भाजपा-शिवसेना महायुती'चे सरकार स्थापन झाले. ‘महायुती'च्या गेल्या २ वर्षाच्या काळात शासनाने राज्यातील शेतकरी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय आणि अंमलबजावणी तसेच राज्याच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जाहीर केलेल्या ऐतिहासिक ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना'ची माहिती उपनेते विजय नाहटा यांनी दिली.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, पात्र कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत, शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ, दरवर्षी १० लाख युवकांना प्रशिक्षण, मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप, कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजारांची मदत आदि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘महायुती सरकार'ने घेतलेल्या कल्याणकारी योजनांबाबत विस्तृत माहिती देऊन त्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन विजय नाहटा यांनी यावेळी केले.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका हद्दीतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघ मध्ये आमदार ‘भाजपा'चे आहेत. यामुळे नवी मुंबईत भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी आमचा शिवसेना पक्ष देखील अधिक भक्कम व्हावी यासाठी नवी मुंबईतील एक विधानसभा मतदार संघ ‘शिवसेना'ला मिळावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी यावेळी सांगितले.

तसेच नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचे झोपडपट्टी विकास योजना अंतर्गत पुनर्वसन व्हावे यासाठी झोपडपट्ट्यांचे मध्यंतरी सर्वेक्षण सुरु करण्यात आले  होते. पण, काही पुढाऱ्यांनी ते नको म्हणून सर्वेक्षण थांबविले आहे. सध्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे विजय चौगुले यांनी स्पष्ट केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्य व्यवसायाला धोका