अंबरनाथ मध्ये पाणीटंचाई; ‘काँग्रेस'चा मोर्चा

अंबरनाथ : गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील अनेक परिसरात ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'तर्फे जाहीर सूचना न देता आठवड्यातून ३ दिवस अर्थात दिवसाआड (बाय डे) पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई दाखवून नागरिकांना नाहक त्रास देण्यात येत असल्यामुळे ‘अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस'तर्फे २ जुलै रोजी ‘एमजेपी'च्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

‘अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस'चे अध्यक्ष ॲड. कृष्णा रसाळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध भागातील पाणी प्रश्न, कृत्रिम पाणी टंचाई, टँकर लॉबी सारख्या जीवनोपयोगी प्रश्नाचे निवारण करणे तसेच अन्य तक्रारींकरिता ‘जीवन प्राधिकरण'च्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. यावेळी तक्रारीचे निवेदन कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांना देण्यात आले.

दरम्यान, यावेळी ‘काँग्रेस'च्या पदाधिकाऱ्यांनी मौखिक तक्रारी मिलिंद देशपांडे यांना केल्या. परंतु, असमानधारक उत्तरे दिल्यामुळे देशपांडे यांनी आपल्यावर रोष ओढवून घेतला.

यावेळी ॲड. कृष्णा रसाळ पाटील यांनी शहराजवळील उल्हास नदीमध्ये आणि बॅरेज मध्ये मुबलक पाणी असताना पाणीटंचाई का? असा प्रश्न उपस्थित केला. तर खजिनदार के.गोपाळराय यांनी या पूर्वी ‘एमजेपी'मध्ये सर्व अधिकारी चांगले काम करत होते. परंतु, अलिकडच्या काळात पाणी समस्या निर्माण झाली आहे. पाणी बिलामध्ये फेरफार करण्यात येऊन ग्राहकांना अवाजवी बिले देण्यात येते. यावर तोडगा निघाला नाही तर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा गोपाळराय यांनी दिला. तसेच महिला पदाधिकारी अनिता जाधव यांनी रात्री, अपरात्री पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पाणी कधी येते आणि कधी नाही, ते महिलांना समजत नाही. त्यामुळे वेळेवर पाणी पुरवठा करण्याची जाधव यांनी मागणी केली.

सदर मोर्चा मध्ये ‘अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस'चे रोहित कुमार प्रजापती, के.गोपाळराय, अनिता जाधव, राजेंद्र मिश्रा, अजिंक्य लोंढे, जय शंकर, सईदा बेगम, देवडे यांच्यासह इतर काँगेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘शिवसेना'चा नवी मुंबईतील विधानसभेच्या एका जागेवर दावा