इर्शाळवाडी आपद्‌ग्रस्तांना घरांची प्रतिक्षा  

नवी मुंबई : वर्षभरापूर्वी घडलेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर ४४ आपद्‌ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ‘सिडको'तर्फे उभारण्यात येणाऱ्या ४४ घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. ३१ जुलै पूर्वी घरांचे आणि इतर सोयीसुविधांचे बांधकाम पूर्ण करुन घरांचा ताबा जिल्हाधिकारी-रायगड यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय शान्तनू गोयल यांनी दिली.  

दरम्यान, ‘सिडको'कडून घरांचा ताबा मिळताच सदर घरांचे वाटप इर्शाळवाडी आपद्‌ग्रस्तांना तातडीने केले जाणार असल्याचे ‘रायगड'चे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. त्याकरिता घरे वाटपाची लॉटरी देखील काढण्यात आल्याचे जावळे म्हणाले.  

इर्शाळवाडीतील आपद्‌ग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता जिल्हाधिकारी रायगड यांनी २.६ हेक्टर जागा देऊ केली. सदर जागेवर ‘राज्य रस्ते विकास महामंडळ'चे मुख्य नियोजनकार जितेंद्र भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनकारांच्या टीमने आणि जीआयएस या अद्ययावत सॉपटवेअर प्रणालीमधील तज्ञांनी युध्दपातळीवर काम करुन अवघ्या ८ दिवसांत पुनर्वसनाचा आराखडा तयार केला.    

या दरड दुर्घटनेतील नागरिकांना ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे एकूण ४४ रहिवास वापराखालील भूखंड, सपाट पातळीवर देण्यात आले आहेत. सदर जागा देखील काही प्रमाणात जमिनीपासून उंचावर असल्यामुळे भविष्यात कुठलाही धोका टाळण्यासाठी जागेच्या सर्व बाजुस ८-९ मीटरची आरसीसी संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे.  

दरम्यान, इर्शाळवाडी आपद्‌स्तांसाठी पुनर्विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी भले ‘एमएसआरडीसी'वर होती. परंतु, या आपद्‌ग्रस्तांना घरे बांधून देण्याची जबाबदारी शासनाने ‘सिडको'वर सोपवली होती. त्याकरिता अवघ्या ६ महिन्यांचा कालावधी ‘सिडको'ला देण्यात आला होता. परंतु, दुर्घटनेनंतर पुढील ३ महिने पाऊस सुरु राहिल्यामुळे घरांचे काम सुरु करण्यास ‘सिडको'ला अडचणी उद्‌भवत होत्या.

‘सिडको'ने उचलला ३३ कोटींचा भार...  

खऱ्या अर्थाने नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘सिडको'ने इर्शाळवाडी आपद्‌ग्रस्तांसाी घर उभारणीच्या कामास सुरुवात केली. आतापर्यंत ४४ पैकी ३० घरांची उभारणी पूर्ण झाली असून १४ घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या ३१ जुलै पर्यंत सर्व ४४ घरांसह येथील नागरिकांसाठी अंगणवाडी, समाजमंदिर, उद्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, खेळाचे मैदान, आदि सुविधांची निर्मिती सिडको पूर्ण करणार आहे.  तसेच येथील नागरिकांना पाणी, वीज, रस्ते, आदि सुविधाही सिडको उपलब्ध करुन देणार आहे.

इर्शाळवाडीतील आपद्‌ग्रस्तांना ४४ घरे आणि सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सिडको'ने एकूण ३३ कोटी रुपये (जीएसटीसह) पदरचे खर्च केले आहेत.  

अडचणींवर मात करत ‘सिडको'कडून वचनपूर्ती...

इर्शाळवाडीतील आपद्‌ग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी मातीचा भराव टाकणे, जमिनीच्या सर्व बाजुस ८-९ मीटरची संरक्षण भिंत उभारणे, एका बाजुस असलेला दगडी डोंगर फोडणे, दोन छोट्या पुलाची निर्मिती, आदि बाबी निर्ध्रारित वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान सिडको समोर होते. त्याचबरोबर रस्ते आणि अन्य सोयी-सुविधा देखील ‘सिडको'ला निर्माण करावयाच्या होत्या. या सर्व अडचणींवर मात करत ‘सिडको'च्या अभियांत्रिकी विभागाने व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली इर्शाळवाडीचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलत पुनर्वसनाचे एक आदर्श उदाहरण राज्यातील इतर शासकीय संस्थांना घालून दिल्याचे बोलले जाते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर, कामोठे मध्ये विशेष करभरणा शिबिरांचे आयोजन